Breaking News

भांबोरा येथील प्रसिध्द लाडूबाई व सिध्देश्‍वर यात्रोत्सव साजरा

कर्जत तालुक्यातील भांबोरा येथील प्रसिध्द लाडूबाई व सिध्देश्‍वर यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला. रंगपंचमीच्या दिवशी उत्सवाला सुरुवात झाली. दोन दिवस चाललेल्या उत्सवात विविध भागातील हजारो भाविकांनी हजेरी लावली.

भांबोरा गावातील पुंडे घराण्यातील प्रतिभादेवी लाडुबाई व गावाचे ग्रामदैवत सिध्देश्‍वर यांचा यात्रोत्सव या भागात दरवर्षी साजरा होतो. पहिल्या दिवशी लाडुबाई व सिध्देश्‍वराची गावातील प्रमुख मानकर्‍यांच्या हस्ते पूजा झाली. नैवेदय दाखवून विधिवत यात्रा उत्सवास सुरुवात झाली. दुपारी लाडपंचमी उडया या नावाने प्रसिध्द असलेला अनोखा लोकोत्सव पार पडला. उंचावरून पाण्यात साहसी उड्या मारून नारळाचे तोरण मिळवण्याचा उत्सव ग्रामस्थांच्या खचाखच गर्दीत संपन्न झाला. यामध्ये गावातील तरूण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संध्याकाळी लाडुबाई व सिध्देश्‍वराची पालखीची वाजत - गाजत संपूर्ण ग्रामप्रदिक्षणा घालण्यात आली. प्रत्येकाच्या दारासमोर, प्रमुख रस्त्यावर सडा-रांगोळी करुन पालखीचे स्वागत करण्यात आले. यात्रेसाठी आलेल्या माहेरवासिनी, नातेवाईक व भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.पालखीसमोर पारंपारिक वादय वाजविण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शेवटी पालखी मंदिरात आणण्यात आली. रात्री मनोरंजनाचा लोकनाटय तमाशा मंडळाचा कार्यक्रम झाला. बुधवारी दुपारी तीन वाजता यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने कुस्त्यांचा जंगी हगामा झाला.