Breaking News

शिर्डीत महाविद्यालयास मान्यता ; पालकांचा आनंदोत्सव


येथील साईनिर्माण प्रतिष्ठानला शहरात सिनियर कॉलेज सुरु करण्यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे. साईनिर्माण आर्टस कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेजला मान्यता मिळाल्याने शिर्डीसह परिसरातील पालक व विद्यार्थ्यांनी फटाके वाजवून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे.

शिर्डी शहरात ११ वी १२ वीपर्यंतचे शिक्षण मिळत होते. मात्र त्यानंतर उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अन्य शहरात जावे लागत होते. उच्च शिक्षणासाठी बाहेरगांवी मुलींना पाठविण्याची मानसिकता नसल्याने इच्छा असूनही मुलींना शिक्षण सोडून द्यावे लागत होते. मुलींना बाहेरगावी पाठविले तर पालकांच्या मनात मुलींच्या सुरक्षिततेविषयी भिती वाटत होती. त्यामुळे अनेक मुलींचे उच्च शिक्षण धोक्यात येत असे. त्यामुळे शिर्डीतच वरिष्ठ महाविद्यालय असावे, अशी अनेक पालकांची गेल्या कित्येक वर्षापासूनची इच्छा होती. शिर्डी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष व साई निर्माण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते यांनी शिर्डीतील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठीची होणारी गैरसोय लक्षात घेत यासाठी शासनाकडे साईनिर्माण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार शासन व सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाने साईनिर्माण प्रतिष्ठान, संचलित साईनिर्माण आर्टस कॉमर्स अॅन्ड सायन्स हे महाविद्यालय सुरु करण्यासाठी इरादापत्राद्वारे मान्यता देण्यात आली. याठिकाणी कला वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखांचे अभ्यासक्रम यावर्षी जून २० १८ मध्ये सुरु केले जाणार आहे, अशी माहिती साईनिर्माण शैक्षणिक संकुल संस्थेचे अध्यक्ष विजयराव कोते यांनी सांगितले.