Breaking News

‘साईनगर-पंढरपूर’ एक्स्प्रेस पुन्हा प्रवाशांच्या सेवेत


मध्यरेल्वेच्या सोलापूर विभागातील दि. १ नोव्हेंबर २०१७ पासून रद्द करण्यात आलेली ‘साईनगर-पंढरपूर’ एक्स्प्रेस ही रेल्वे चार महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर नियमित सुरू झाली. मध्यरेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर - कुर्डूवाडी- दौण्ड या रेल्वे मार्गावरील वाशिंबे व जेऊर दरम्यान कामासाठी ब्लाॅक देण्यात आला होता. त्यामुळे चार महिने साई-पंढरपूर रेल्वे गाडी रद्द करण्यात आली होती. यामुळे रेल्वेच्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले होते. 

राहुरी रेल्वेस्टेशन येथे एक वर्षापूर्वी साई-पंढरपूर या एक्स्प्रेस रेल्वे गाडीला थांबा मिळाला होता. यासाठी माजी खा. प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तालुका रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष उपसरपंच इंद्रभान पेरणे, सचिव मंगल जैन, ज्येष्ठ पत्रकार निसार सय्यद, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पेरणे, उपाध्यक्ष सुर्यभान म्हसे आदींसह ग्रामस्थांनी मध्यरेल्वेचे महाप्रबंधक शर्मा यांची भेट घेतली. सुरूवातीला अल्प प्रतिसाद लाभला. मात्र अंतिम टप्प्यात चांगला प्रतिसाद लाभल्याने या रेल्वे गाडीला थांबा कायम होण्याचे संकेत रेल्वे विभागाकडून मिळत होते. या दरम्यानच गाडीचा थांबा कायम होण्याऐवजी गाडीच रद्द झाली होती. राहुरी रेल्वे स्टेशन हे राहुरी तालुक्याचे प्रमुख ठिकाण असून जागतिक किर्तीचे तीर्थक्षेत्र शिर्डी व शनिशिंगणापूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉ. तनपुरे साखर कारखाना, प्रसाद शुगर कारखाना, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शैक्षणिक संस्था, राहुरी महाविद्यालय, नगर-मनमाड राज्य महामार्ग यामुळे याठिकाणी प्रवासी व नागरीकांची नेहमीच ये-जा सुरू असते. रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम युध्द पातळीवर पूर्ण करण्यात आले. यामुळे रेल्वे स्टेशनचे रूपच पूर्णपणे बदलले गेले आहे. याबद्दल नागरीकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, चार महिने गाडी रद्द करण्यात आलेली रेल्वे सुरू झाल्याबद्दल प्रवाशी व भाविकांनी सोलापूर रेल्वे विभागाला धन्यवाद दिले.