Breaking News

मुक्ताईनगरात विकासकामांसाठी 18 कोटींचा निधी प्राप्त

जळगाव, दि. 12, मार्च - माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या प्रयत्नांनी 50 कोटींच्या एकूण आराखड्यापैकी नव्याने स्थापन झालेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या विविध विकासकामांसाठी 18.35 कोटी निधी प्राप्त झाल्याची माहिती खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते यांनी दिली.


मुक्ताईनगर नगरपंचायतीस प्राप्त झालेल्या निधीतून शहरातील रस्ते, गटारी, स्वच्छतागृह, चौक सुशोभीकरण, कचराकुंड्या यासह विविध विकासकामे तातडीने पूर्ण करण्यासाठी शहरातील रस्त्यांची लांबी व गटारीची लांबी तसेच चौकात हायमास्ट लॅम्प बसविण्यासंदर्भात सर्वेक्षण करून आराखडा तयार करण्यात आला आहे. या नगर पंचायतीसाठी उप मुख्य अधिकारी, लेखापाल व कनिष्ठ अ भियंतांना अतिरीक्त किंवा प्रतिनियुक्तीवर पदभार सोपविण्यात आला आहे. प्राधान्याने शहरातील 25 किलोमीटरचे रस्ते तसेच आवश्यक गटारी बांधकाम करण्यासाठी लवकरच प्रशासकीय मान्यता घेवून निविदा काढण्यात येवून ट्रिमीक्स काँक्रिटीकरणाच्या कामांना गती देण्यात येईल, अशी माहिती कोलते यांनी दिली. खडसे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे 50 कोटींच्या एकूण आराखड्यापैकी 18 कोटी 35 लक्ष रुपये प्राप्त झाले असून नियोजन प्रगतीपथावर आहे. यानंतर मुक्ताईनगरसाठी मोठ्या कचराकुंड्या खरेदी करण्यात येतील या शिवाय भव्य प्रशासकीय इमारत, सुसज्ज जलतरण तलाव, लहान मुलांसाठी पार्क, नाना नानी पार्क, अद्ययावत नाट्यगृह, अग्निशमन दल याचाही 50 कोटीचा विकास आराखड्यात समावेश असल्याचे कोलते म्हणाले.