Breaking News

मंत्र्यांच्या निवासस्थानी आत्मदहन करण्याचा माथाडी कामगारांचा इशारा

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या येथील गोदामात काम करणार्‍या व सातारा जिल्हा माथाडी कामगार मंडळात नोंद असलेल्या माथाडी कामगारांचे पगार 8 ते 10 महिन्यापासून झालेे नाहीत, त्यामुळे माथाडी कामगारांच्या कुटूंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास 12 मार्च रोजी राज्याचे कामगार मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या निवासस्थानी आत्मदहन करणार असल्याचा इशारा माथाडी टोळीचे मुकादम मधुकर यमगर यांनी पत्रकाद्वारे दिला.
यमगर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य वखार महामंडळाच्या येथील गोदामात गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ माथाडी कामगार काम करत आहेत. त्यांची नोंद सातारा जिल्हा माथाडी कामगार मंडळाकडे आहे. तसेच मालक म्हणून राज्य वखार महामंडळ यांची नोंद आहे. मात्र असे असताना येथील माथाडी कामगारांना गत 8 ते 10 महिन्यांपासून पगार मिळत नाहीत. त्यामुळे कामगारांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. वखार महामंडळाच्या येथील गोदामात शासनाचा सर्व माल तसेच कारखान्यांची साखर उतरण्यात यावी, त्या माध्यमातून माथाडी कामगारांना त्यांचा पगार वेळेवर मिळू शकेल, याबाबत कामगार मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी तातडीने लक्ष घालावे, अन्यथा सोमवार, दि. 12 रोजी मंत्री निलंगेकर यांच्या निवासस्थानी आत्मदहन करणार असल्याचा इशारा यमगर यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.