Breaking News

उसतोडणी कामगारांवर उपासमारीची वेळ


खेडे गावांतील व परिसरातील असणारा ऊसतोडणी कामगार राज्याच्या इतर भागात ऊसतोडणी करून मुकादमाच्या उचलीचे ओझे डोक्यावर घेऊन गावाकडे परतला खरा, परंतू सोबत आणलेले वाढे व जनावरांचा चारा आणि मीठ, पिठ, मिरची चार पाच दिवसांत संपल्या. त्यामुळे जामखेड तालुक्यातील ऊसतोडणी कामगारांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. महिलांना शंभर रूपये रोजंदारीने सुध्दा रोजगार मिळणे कठीण झाले. पुरूषांनाही कोणतेच काम नाही. त्यामुळे दामही नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता सहा महिने ऊसाचे ओझे वाहणार्‍या जनावरांना काय खाऊ घालायचे? असा प्रश्‍न कामगारांसमोर उभा राहीला आहे. जनावरांकडे पाहून कामगारांच्या घशाखाली घास उतरत नाही. बाजारात जनावरे विक्रीसाठी घेऊन गेले तर खाटीक शिवाय गिर्‍हाईक नाही. ज्यांच्या जीवावर मुकादमाकडून उचल घेऊन मुलींचे लग्न केली, बाकी कार्यक्रम केले, ज्यांना सहा महिने दिवसरात्र गाडीला जुंपतो, त्यांना खायला काय घालणार? या प्रकारच्या संकटात सध्या ऊसतोडणी कामगार सापडला आहे. शाळकरी मुलांना सोबत घेऊन रोजगार हमीच्या कामावर जाऊन दुष्काळाला सामोरे जाण्यास ऊसतोडणी कामगार तयार आहे. मिळेल ते तसेच पडेल ते काम करण्यास तयार आहे. परंतू जामखेड तालुक्यात कोठेही रोजगार मिळेना. जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग यांची प्रत्यक्षात कोणतीच कामे चालू नाहीत. असले तरी ती कामे जनतेपर्यंत येत नाहीत. वन खाते मार्फत खड्डे खोदायचे कामे झाली. वन अधिकार्‍यांनी परराज्यातील लोक घेऊन खड्डे खोदून घेतले. काही ठिकाणी रात्रीतून यंत्रांच्या मदतीने खड्डे घेतले आहे. परंतू नान्नज गावात मजूर असताना येथील मजूरांना काम दिले नाही. काही बोगस बिल काढायचे आणि वरिष्ठांना कामे करून घेतल्याचे सांगणे अशा प्रकारे अधिकारी जनतेची फसवणूक करतात. आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो. नान्नज, जवळा परिसरात शेतीची कोणतीच कामे चालू नाहीत. पाऊस पडे पर्यत जगायचे कसे अशी परिस्थिती नान्नज, जवळा, खर्डा, अरणगाव, सोनेगाव, पिंपरखेड, हळगाव या खेडेगावात झाली आहे. ऊन्हाळा असल्याने गाव देखील पुर्णपणे शांत आहे.