Breaking News

नान्नज गावची वीज सारखीच होते गायब ! एकच वायरमन तेदेखील शिकाऊ


तालुक्यातील नान्नज येथे भारनियमनामुळे शेतकर्‍यांसह व्यापारी वर्ग अडचणीत आला आहे. नान्नज गावाचा वीजपुरवठा सारखाच खंडित केला जात आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वेळ काय आहे का नाही असा प्रश्‍न शेतकरी व व्यापारी करत आहेत. दिवसभरात तासभर वीज राहते की लगेच तासानंतर गायब होते. वीज कधीही अचानक गायब होते. त्यासाठी कोणतेही वेळेचे बंधन दिसून येत नाही. दिवसभराची अशी परिस्थिती असतानाच रात्रीची ही वीज कधीही गायब होते हे देखील समजून येत नाही. यावर्षीचा उन्हाळा चांगलाच जाणवत आहे. वीज नसल्यामुळे नागरिकांना घरामध्ये थांबणे कठीण होऊन बसले आहे. जामखेड तालुक्यातील नान्नज ही दुसर्‍या नंबरची बाजारपेठ आहे. त्या नान्नज गावासाठी एकच वायरमन आहे. ते देखील शिकाऊ आहेत. मागील वर्षभरापासून वायरमनचे तीन ते चार जागा नान्नजमध्ये रिक्त आहेत. त्याठिकाणी वायरमन भरणार की नाही, अधिकारी झोपले की काय असा सवाल नान्नजचे नागरिक करत आहेत. पालकमंत्री राम शिंदे यांच्या जामखेड तालुक्यात महावितरण कार्यालयात एक वर्षापासून प्रभारी अधिकारी असल्याने अधिकार्‍यांचा कर्मचारी वर्गावर कसलाच वचक राहीला नाही. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांना बारा तास वीजपुरवठा केले जाईल अशी घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. या घोषणेच्या अगदी उलट धोरण महावितरणच्या अधिकारी व वायरमन यांनी नान्नज गावासाठी केला आहे. बारा तासात वीज कधीही केव्हा ही गायब होते, म्हणून शेतकर्‍यांवर विजेचे सुलतानी संकट उभे राहिले असून, उभी पिके पाण्यावाचून जळू लागली आहेत. मागील 5 ते 6 वर्षांपासून असलेल्या दुष्काळातून शेतकरी सावरला जात आहे. शेतातही काही पिकले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. चालू वर्षी नान्नज व परिसरात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी कर्ज काढून शेती वहीत केली. रब्बी हंगामात कांदा, ज्वारी, उसासारखी पिके आता चांगली जोमात आहेत. पाणी मुबलक असल्याने शेतकरी आनंदी आहे. मात्र त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद फार काळ टिकला नाही. महावितरणने शेतीसाठी सुरूवातीला बारा तास वीजपुरवठा केला. मात्र गेल्या 15 ते 20 दिवसांपासून वीज अवेळी गायब होत आहे. वीज नसल्याने उभ्या पिकांना पाणी देण्यास अनेक अडचणी येत आहेत. पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने वीज असुनही अनेक वेळा पंप सुरू करता येत नाही. मागील काही वर्षाच्या तुलनेत चालू वर्षी चांगला पाऊस झाला आहे. पाणी मुबलक प्रमाणात असल्याने शेतकर्‍यांनीदेखील त्याच जोमाने पिके घेेतली. मात्र आजमितीस पिकांना पाणी देण्यासाठी वीजपुरवठाच होत नाही. शेतकर्‍यांना विजेचा तुटवडा भासत आहे. नान्नज गावची विज कायमच गायब होण्यात सुधार न झाल्यास नान्नजच्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.