Breaking News

सर्वसामान्य जनतेला तहसीलदारांच्या दालनात जाण्यास शिपायांकडून मज्जाव


श्रीरामपूर / राजेश बोरुडे / शहर प्रतिनिधी /- वेळ दुपारची पावणेचार वाजेची ..साहेबांच्या दालनाला बाहेरून कडी लावलेली...... बाहेर दोन पुरुष व दोन महिला शिपाई दालनाच्या बाहेर...मातापूर, संगमनेरसह दूरवरून आलेले लोकं त्या शिपायांना साहेब आहे का? साहेबांकडे काम आहे आत जाऊ का? असे विचारायचे.साहेबांच्या दालनाला बाहेरून कडी लावून साहेब आत 'काम' करत असताना बाहेर असलेले शिपाई साहेब आत नाहीत असे सांगून कामासाठी आलेल्या लोकांना परतवून लावत होते. ही संतापजनक घटना गुरुवारी,८ मार्चच्या दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दुपारी तहसील कार्यालयात कामानिमित्त अनेक आलेले लोकं तहसीलदारांच्या दालनाच्या बाहेर उभे होते. दालनाच्या बाहेर असलेले शिपाई कामानिमित्त दूरवरून आलेल्या लोकांना साहेब आत नाही. असे सांगून परतवून लावत होते. तहसीलदारांच्या केबिनला बाहेरून कडी लावून तब्बल चार शिपाई दालनाच्या बाहेर उभे करून साहेब आत नाहीत असे सांगण्यासाठी ठेवलेले होते. कामासाठी आलेले नागरिक तासनतास बाहेर उभे होते. बाहेर असलेल्या शिपायांकडे साहेब आत असताना नाही का सांगता?अशी विचारणा केली असता, साहेबानी लोकांना साहेब नाही. असे सांगायला सांगितले आहे. तहसिलदांरच्या दालनाच्या बाहेर असलेले शिपाई लोकांना आत जाऊ देत नाहीत. असा अनुभव अनेकदा लोकांना आला आहे. सर्वसामान्य जनता त्यांच्या कामासाठी शासकीय कार्यालयात दूरवरून येत असताना अधिकाऱ्यांच्या दालनाला बाहेरून कडी लावून अधिकारी आत असताना शिपायांना साहेब आत नाहीत हे सांगण्याइतपत अधिकाऱ्यांची मजल गेली असल्यामुळे सर्वसामान्य जनतेत अशा अधिकार्यांबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला असून या असंतोषचा उद्रेक होऊ शकतो. दालनाच्या बाहेर असलेले शिपाई नेहमीच सामान्य जनतेला तहसीलदारच्या केबिन मध्ये जाण्यास मज्जाव करत असतात. जनतेच्या करातूनच शासकीय अधिकार्यांना लठ्ठ वेतन दिले जात असताना अधिकारी जनतेचे कामे करण्यास असमर्थ ठरत आहेत.