Breaking News

मोटारसायकलवरील महिलांची रॅलीला मिळाला प्रचंड प्रतिसाद


देवळाली प्रवरा/प्रतिनिधी /- जागतिक महिला दिनानिमित्‍त आयोजीत केलेल्‍या जनजागृती रॅलीला उदंड प्रतिसाद मिळाला. शहरात मोटारसायकलवरील महिलांची रॅली प्रथमच निघाली असून या रॅलीत महिलांनी भगवे फेटे व महाराष्‍ट्रीयन पोशाख घालून रॅलीत सहभागी झाल्‍या. या रॅलीचे विविध ठिकाणी उत्‍स्‍फुर्तपणे नागरीकांनी स्‍वागत केले.
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्‍या महिला बालकल्‍याण समितीच्‍या वतीने जागतिक महिला दिनानिमित्‍त जनजागृती रॅली काढण्‍याचे नियोजन करण्‍यात आले होते. या रॅलीत मोटारसायकल, सायकल, ट्रॅक्‍टर, जीप आदी वाहनाद्वारे महिला रॅलीत सहभागी झाल्या होत्या. रॅलीचे नियोजन प्रिती सत्‍यजित कदम यांनी केले होते. या रॅलीत पदमश्री शितल महाजन, बँक ऑफ इंडियाच्‍या कायदा व्‍यवस्‍थापक व राष्‍ट्रीय खेळाडू अॅड. अमोला दरेकर-शर्मा, राष्‍ट्रीय खेळाडू व निवृत्‍त एन.सी.सी. कॅप्‍टन अनिता दरेकर, महिला बालकल्‍याणच्‍या सभापती बेबीताई मुसमाडे, उपसभापती केशरबाई खांदे, नगरसेविका सुजाता कदम, नंदा बनकर, संगीता चव्‍हाण, उर्मिला शेटे, अंजली कदम, कमल सरोदे, सारीका कदम, विद्या कदम, ईश्‍वरी कदम, मिना शेटे, जमुना शेटे, चंद्रकला कदम, प्रमिला कोळसे, अनिता वीर, सुप्रिया ढुस, अनुजा कदम, सुप्रिया शिंदे, अनुजा मुळे, अनुराधा कपिले, सुनंदा शिंदे, पुनम महाजन, प्रतिभा हुडे, सविता हारदे, सोफीया बागल यांच्‍यासह शहरातील महिला सहभागी झाल्‍या होत्‍या. 

देवळाली प्रवरा शहरात जागतिक महिला दिनानिमित्‍त प्रिती सत्‍यजित कदम यांच्‍या संकल्‍पनेतुन प्रथमच महिलांची रॅली निघाली होती. महिला दिनानिमित्‍त काढण्‍यात आलेल्‍या महिला रॅलीचे विविध स्‍तरावर नागरीकांनी स्‍वागत केले. महिलांची रॅली पाहण्‍यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती, राहुरी तालुक्‍यात महिलांची रॅली प्रथमच निघाली असून या रॅलीला उदंड प्रतिसाद मिळाला. ही रॅली राहुरी कारखाना येथील अश्‍वारुढ शिवाजी महाराजाच्‍या पुतळयास पुष्‍पहार घालुन सुरु करण्‍यात आली होती. राहुरी कारखाना, विठा माधव नाका, इरिगेशन बंगला, देवळाली प्रवरा सोसायटी चौक, बाजारतळ, शनि मंदीर, त्रिंबकराज मंदीर रोड, राम मंदीर चौक, शिवाजी चौक, नगरपालिका कार्यालय आदी भागातुन संचालन करीत श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज सांस्‍कृतिक भवन या ठिकाणी सांगता करण्‍यात आली.