Breaking News

त्रिदिनात्मक सोहळ्याची श्री क्षेत्र बहिरवाडी येथे सांगता


नेवासा तालुक्यातील श्री. क्षेत्र बहिरवाडी येथील श्री काळभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त आयोजित त्रिदिनात्मक धार्मिक सोहळ्याची गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने काल उत्साहात सांगता झाली. जीवनात भगवंताच्या भक्तीच्या उपासनेला दृढ चालवण्याचा निर्धार करा व धार्मिक कार्याच्या माध्यमातून धर्माचे वैभव वाढवा असे आवाहन यावेळी हभप गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलताना केले. श्री. काळभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते श्री. काळभैरवनाथांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. मंदिराचे सर्व काम पूर्ण झाले असून यावेळी मंदिर परिसराची त्यांनी पाहणी केली. यावेळी देवस्थानच्या वतीने संत महंतांचे संतपूजन करण्यात आले. त्रिदिनात्मक सोहळ्यात योगदान देणार्‍यांचा यावेळी श्रीफळ प्रसाद देऊन गौरव करण्यात आला. यावेळी हभप. भास्करगिरी महाराज म्हणाले की, प्रवरेच्या मध्यधारेवर असलेले श्री. काळभैरवनाथांचे नवीन मंदिर बांधून पूर्ण झाले आहे. आता मुख्य प्रवेशद्वारामधील सभामंडपाचे काम बाकी आहे, तेही काम पूर्णत्वाकडे जाईल अशा शुभेच्छा देऊन येथे वर्षभर धार्मिक कार्यक्रम चालत असतात ते असेच सुरू ठेऊन धर्माचे वैभव वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, जरुरी नसलेल्या वस्तू जीवनात खरेदी करण्याचा प्रयत्न करून नका असा उपदेशही त्यांनी यावेळी दिला. नसेल तर जरुरीच्या वस्तू विकण्याची वेळ येईल असे सांगितले. त्यांनी देवाच्या नामात मोठी ताकद असून हे नाम प्रत्येकाने अंतकरणापासून घेतले पाहिजे, परमार्थ करतांना ध्यान देवाच्या चरणाकडे ठेवा मोडकळीस आलेल्या देवालयांचा जिर्णोद्धार सर्वांनी एकत्र येऊन करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी महंत सुनीलगिरी महाराज, आ. बाळासाहेब मुरकुटे, महंत चंद्रशेखरभारती महाराज, जागृती आश्रमाचे महंत शंकरगिरी महाराज, हभप रामनाथ महाराज पवार, अगस्ती आश्रमाचे हभप. मच्छिंद्र महाराज पठाडे, हभप विजय महाराज पवार, हभप. लक्ष्मण महाराज नांगरे, हभप. गणेश महाराज दरंदले, हभप अतुल पठाडे, संत सेवेकरी बदाम महाराज पठाडे, हभप. बाळू महाराज कानडे, हभप तात्या महाराज शिंदे, विणेकरी हभप दिनकर महाराज हारदे, हभप. अर्जुन महाराज वांगीकर यांच्यासह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. विश्‍वस्त सीताराम घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले.अध्यक्ष अशोक कोलते यांनी आभार मानले.