Breaking News

बाभुळगाव येथे जलयुक्त शिवार कामांना वेग


कर्जत तालुक्यातील बाभूळगाव खालसा येथे जलयुक्त शिवार अभियानातंर्गत कृषी विभागाने कामे चालू केली आहेत. कम्पार्टमेंटची 878 हेक्टर क्षेत्रावर कामे हाती घेतली आहेत. कर्जत तालुक्यातील काही गावात यापूर्वी चांगल्या प्रकारे जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. तसेच उर्वरीत गावात हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यातील बाभुळगाव खालसा याठिकाणी कृषी विभागाची कामे प्रगतिपथावर आहेत. प्रत्येक शेतात उताराच्या बाजूने आडवे व उभे एक बाय एक मीटरचे बांध करण्याचे कामे सुरू आहेत. यास शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी सांगितले की, या कामांमुळे शेतकर्‍यांना फायदा होईल. प्रत्येक शेतात पडणारे पावसाचे पाणी त्याच शेतात जिरवले जाईल, त्यामुळे पाणी पातळी नक्कीच वाढणार आहे. त्याचबरोबर विभागाकडून मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत पन्नास शेततळ्यांचा शेतकर्‍यांनी लाभ घेतला आहे. पुढील काही दिवसांत चार किमी ओढा खोलीकरण व रुंदीकरण कामे मंजूर असून पुढील महिन्यात टेंडर प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर कामे सुरू करण्यात येणार आहेत, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. वरील सर्व कामे कर्जत तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल कृषी अधिकारी सोनाली हजारे, कृषी पर्यवेक्षक शिवाजी मुरकुटे व कृषी सहाय्यक सचिन कालेकर करुन घेत आहेत.