Breaking News

मंत्रालयात पुन्हा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई : मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे सत्र थांबायचे नाव घेत नसल्याचे निदर्शनास येत आहे. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न एका ग्रामस्थाने केला. पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून या ग्रामस्थाला ताब्यात घेतले आहे. गुलाब शिंगारी(वय-56), असे या ग्रामस्थाचे नाव आहे.

गुलाब शिंगारी हे मूळचे लासलगाव येथील रहिवासी आहेत. पोलीस पाटील आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्या घरावर अवैधरित्या कब्जा केल्याचा त्यांचा आरोप आहे. याबाबत न्याय मिळावा या मागणीसाठी ते मंत्रालयात हेलपाटे घालत होते. दरम्यान मंत्रालयातल्या सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या माहिती नुसार शिंगारी यांनी मंत्रालयात आज प्रवेशच केला नाही. आपल्या कामानिमित्त त्यांनी कोणत्याही कार्यालयात संपर्क साधला नाही. केवळ प्रवेशद्वाराजवळ त्यांनी सोबत आणलेल्या बाटलीतून अंगावर रॉकेल ओतून घेतल्याचे सांगितले. या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.