Breaking News

दारूबंदीसाठी महिलांची पोलीस ठाण्यावर धडक

सिंधुदुर्गनगरी, दि. 19, मार्च - आठवडाभरापूर्वी दोडामार्ग तालुक्यात मुळस येथील दारू विक्रेत्यांच्या घरावर मोर्चा नेऊनसुद्धा त्यांनी दारू विक्री सुरु ठेवल्याने आणि पोलिसांकडून काहीच कारवाई न झाल्याने अखेर शुक्रवारी तेरवण मेढे, सोनावल आणि पाळये येथील महिलांनी पोलीस ठाण्यावरच धडक मोर्चा काढला. दोडामार्ग तहसीलदार रोहिणी रजपूत आणि पोलीस निरीक्षक सुनील घासे याना निवेदन देवून त्यांच्याशी त्यांनी चर्चाही केली.

तेरवण मेढे ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत तेरवण, तेरवण मेढे, सोनावल, पाळये आदि गावे येतात. त्यात मूळसवाडीही आहे. हेवाळे आणि मूळस खरारी नदीपात्रालगत आहेत. मूळस येथे काही ठिक ाणी गोवा बनावटीची आणि देशी दारू विकली जाते. आठवडाभरापूर्वी त्या विक्रेत्यांच्या घरांवर मोर्चा नेत दारूविक्री बंद करण्यासाठी आठ दिवसांची डेडलाईन दिली होती. परंतु ना त्यांनी दारू विक्री बंद केली, ना पोलिसांनी ती बंद पाडली, त्यामुळे डेडलाईन संपताच येथील सर्व महिलांनी येथील तहसील आणि पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला. तेरवण मेढे ग्रामसंघाच्या अध्यक्षांसह 24 बचतगटातील अध्यक्ष आणि सदस्य यात सहभागी झाल्या होत्या.
चंद्रकला केसरकर, साक्षी दळवी, मनीषा गवस, लांबर आदींनी तहसीलदार रजपूत आणि पोलीस निरीक्षक घासे यांच्याशी चर्चा केली. यावेळी उपस्थित महिलांनी एका महिलेला दारुच्या नशेत नवर्‍याकडून मारहाण झाल्याने तिचा हात दुखावल्याचे सांगितले. घासे यांनी नवर्‍याविरुद्ध तक्रार द्या असे सांगताच सरपंच प्रवीण गवस यांनी वैयक्तिक तक्रारी घेण्यापेक्षा तक्रारीचे मूळ असलेले दारू धंदेच बंद करा असे सांगितले. तुमच्या बीट हवालदाराला सगळ माहीत असताना ते बंद का होत नाहीत, असा प्रश्‍न विचारला. या वेळी महिलांनी घासे यांना निवेदन देवून तत्काळ कारवाई करा, अशी मागणी केली.