Breaking News

बिबट्यांची हत्या करून अवयवांची तस्करी करणारी टोळी इगतपुरीत जेरबंद

नाशिक, दि. 19, मार्च - इगतपुरी तालुक्यात बिबट्या आदी जंगली प्राण्यांची हत्या करून त्या प्राण्यांच्या अवयवांची लाखो रुपयांना विक्री करणारी टोळी जेरबंद करण्यात इगतपुरीच्या वनखात्याला यश आले आहे. वनपरिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनी स्वतः चतुराईने बनावट ग्राहक बनून ह्या टोळीचा पर्दाफाश केला. याप्रकरणी 6 जणांना वन कायद्यानुसार अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयितांना 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तालुक्यातील खेड मांजरगाव भागातील डोंगरावर बिबट्या ह्या प्राण्यांच्या कातडी, नखे, मिश्या विकणारी टोळी खरेदीदारांच्या शोधात असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार जाधव यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे आणि जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती दिली. अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनानुसार गोरक्षनाथ जाधव हे वारंघुशी ता. अकोले जि. अहमदनगर येथे बनावट ग्राहक बनून गेले. त्यांच्यासह वन विभागाचे संतोष बोडके, बी. व्ही. दिवे, एफ. झेड. सैय्यद, विजय चौधरी, वनरक्षक रामा क ोठुळे आदी उपस्थित होते.
यावेळी वस्तूंची सौदा किंमत 6 लाख रूपये ठरवण्यात आली. बिबट्यांना मारूनच संबधित वस्तू विक्री होत असल्याची खात्री झाल्याने त्यांनी आरोपी दिलीप शंभू पोकळे वय 21, गोरख पोपट पोक ळे वय 20 दोघे रा. पोकळवाडी खेड, भाऊराव संतु भले वय 25 रा. बारशिंगवे, सोमा लक्ष्मण मधे वय 48 रा. चिंचोडी ता. अकोले, राजू चंदर पुंजारे वय 35 रा. धारगाव ह. मु लोहशिंगवे, मारुती वाळू भले वय 24 रा. बारशिंगवे यांना वेगवेगळ्या ठिकानांवरून शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्यावर वन्यजीव सरंक्षण अधिनियम 1972 च्या कलम 9,39 ( अ, ब ), 50, 51 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली असुन 20 नखे, बिबट्याच्या मिश्या ताब्यात घेणे बाकी आहे. संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता गुन्ह्यात सहकार्य करणारे इतर आरोपी आणि तपास करण्यासाठी त्यांना 5 दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली.
वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी गोरक्षनाथ जाधव, वनरक्षक संतोष बोडके, बी. व्ही. दिवे, एफ. झेड. सैय्यद, विजय चौधरी, वनरक्षक रामा कोठुळे वनपाल डी. जे. राव, जब्बार पटेल, मुज्जु शेख आदी हे पुढील तपास करीत आहेत.
इगतपुरी तालुक्यात बिबट्यांची संख्या जास्त असल्याने बिबट्यांची हत्या करणारी टोळी सक्रिय झाली होती. जागरूक असणारे वनपरिमंडल अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनी सक्रियता राखल्याने टोळीचा पर्दाफाश करता आला. यापूर्वीही जाधव यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास केलेला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वनपरिमंडल अधिकारी गोरक्षनाथ जाधव आणि परिमंडळ भंडारदरा राऊंड कर्मचारी सहकार्‍यांचे इगतपुरी तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे.