Breaking News

थरमॅक्समध्ये केशवराव घोळवे पॅनलचे वर्चस्व

पुणे, दि. 19, मार्च - मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार थरमॅक्स ली. चिंचवड येथे थरमॅक्स कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक मतदानाद्वारे संपन्न झाली. या निवडणुकीकडे जिल्ह्यातील दिग्गजांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीमध्ये केशवराव घोळवे यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनल एकमताने निवडून आला. हा विजय कारखान्यातील प्रामाणिक कार्यकर्त्यांचा विजय आहे. ही कमिटी यापुढे कंपनी हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन कामगारांच्या हिताचे संवर्धन करणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडल्याबद्दल त्यांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून थरमॅक्सचे प्रवीण खेसे तर निवडणूक कमिटी म्हणून प्रकाश जोध, शत्रुघ्न गोडगे, एम. एस. राखुंडे, बी. जे. सपकाळ यांनी काम पाहिले. केशवराव घोळवे यांनी कंपनी हित जोपासत कामगारांप्रती दिलेले योगदान, अहोरात्र कष्ट करून कामगारांच्या कल्याणासाठी झटत असताना कुटील कटकारस्थान करून अशा चांगल्या कामगार नेत्यांना कंपनीतून बडतर्फ करण्यात आले होते. कामगारांना मागील तीन वर्षे सतत दहशतीमध्ये ठेवण्यात आलेले होते. याचीच चीड कामगारांच्या मनात खदखदत होती. त्याचे परिणाम म्हणून कामगारांनी केशवराव घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पॅनल निवडून देत पुन्हा एकदा केशवरावांच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवला, अशा भावना यावेळी कामगारांनी व्यक्त केल्या. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांनी शिवशंभो फाउंडेशन शाहूनगर येथे फटाक्यांचा आतषबाजीमध्ये गुलाल उधळून व पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला. विजयी उमेदवारांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.