Breaking News

अंधेरी ते गोरेगाव हार्बर लाईनची विस्तारीत सेवेचा शुभारंभ


अंधेरी ते गोरेगाव या विस्तारीत हार्बर रेल्वे लाईनचा आज केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपनगरीय रेल्वेसाठी विविध ४९ सुविधांचाही रेल्वेमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
गोरेगाव रेल्वे स्थानकावर झालेल्या या कार्यक्रमास महिला बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार अनिल साटम, रेल्वेचे सरव्यवस्थापक ए.के. गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. गोयल म्हणाले की, केंद्र शासनाने मुंबईतील रेल्वे सुविधांचा विकास करण्यासाठी ५४ हजार ७७७ कोटी रूपयांचे विविध प्रकल्प हाती घेतले आहे. हार्बर लाईनचा विस्तार बोरिवलीपर्यंत करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनल ते पनवेल एलिवेटेट कॉरिडॉर, पनवेल ते विरार रेल्वेसेवा, अत्याधुनिक सिग्नल सिस्टीम, वातानुकूलीत लोकल सेवा असे विविध प्रकल्प नजीकच्या काळात सुरू केले जाणार आहे.देशातील पायाभूत सुविधा निर्मीतीच्या एकूण कामांपैकी ५० टक्के कामे हे एकट्या महाराष्ट्रात सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.