Breaking News

शिक्षण कोठेही घ्या पण मातृभूमीला विसरू नका - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू



शिक्षण हे कधीही संपत नाही, ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. केवळ पदवी घेणे हेच शिक्षण नाही, तर वेगवेगळ्या माध्यमातून ज्ञान मिळविणे हे खरे शिक्षण आहे. ज्ञानार्जनासाठी अथवा अर्थार्जनासाठी परदेशी जा, मात्र त्याचा उपयोग आपल्या मातृभूमीसाठी करा असे सांगत मातृभाषेला व जन्मभूमीला कधीही विसरू नका, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज केले.
पिंपरी येथील संत तुकाराम नगर येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा नववा पदवीदान समारंभ उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत आज पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील, विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील, कुलगुरू डॉ. पी. एन. राजदन, पुढारी पब्लिकेशनचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापसिंह जाधव, भुवनेश्वरच्या केआयआयटी संस्थेचे संस्थापक डॉ. अच्युत समानथा, पारनेरच्या गुरू सेवा मंडळाचे अध्यक्ष ॲड विष्णू पारनेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पुढे म्हणाले, शिक्षण हे केवळ नोकरीच्या सुरक्षिततेसाठी नसते. तर शिक्षण हे ज्ञान मिळविण्याचे साधन आहे. पदवी ही तुमच्या आयुष्याच्या पुस्तकाचे एक पान आहे. आयुष्यभर ज्ञानार्जन करून अशी अनेक पाने आपल्या आयुष्यात जमवा. ज्ञानाच्या माध्यमातून स्वत:ला ओळखा, स्वत:ला शोधा. ज्ञानाच्या माध्यमातून कौशल्यासह आपल्या वर्तणुकीतून चांगले व्यक्तिमत्व घडवा.