Breaking News

राज्यात २५ हजारहून अधिक अंगणवाड्यांमध्ये तयार होणार परसबागा


कुपोषण निर्मुलन करण्याच्या दृष्टीने राज्यातील अंगणवाड्यांमध्ये परसबागा (Kitchen or Backyard
Gardens) निर्माण करण्याचा कार्यक्रम रिलायन्स फाउंडेशन आणि महिला -बालविकास विभाग यांच्यामार्फत हातीघेण्यात आला आहे. राज्यातील १६ जिल्ह्यांमधील अंगणवाड्यांमध्ये २५ हजारहून अधिक परसबागा तयार करण्याच्या दृष्टीने आज महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रिलायन्स फाउंडेशन व महिला - बालविकासविभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. राज्य शासनामार्फत राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही ही योजना राबविण्यात येईल, असे मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

रिलायन्स फाउंडेशन आणि महिला - बालविकास विभागामध्ये २०१५ मध्ये झालेल्या सामंजस्य करारान्वये राज्यातील पुणे, ठाणे, पालघर, यवतमाळ, जळगाव, परभणी, उस्मानाबाद आणि वर्धा या ८ जिल्ह्यांमध्ये सुमारे ७ हजार ३०० परसबागातयार करण्यात आल्या आहेत. या बागांमध्ये पिकणारा भाजीपाला, फळे यांचा उपयोग सुमारे १ लाख ६५ हजारहून अधिक बालकांना पोषण आहारात होत आहे. आज या सामंजस्य कराराची व्याप्ती १६ जिल्ह्यांपर्यंत वाढविण्यात आली. आता हीयोजना बीड, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, गोंदीया, सोलापूर, नंदूरबार आणि चंद्रपूर या नवीन ८ जिल्ह्यांमध्येही राबविण्यात येईल. या एकूण १६ जिल्ह्यांमध्ये २५ हजारहून अधिक अंगणवाड्यांमध्ये परसबागा तयार करण्याचे उद्दीष्ट आज निर्धारितकरण्यात आले. याचा लाभ साधारणत: ७ लाख ५० हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. या योजनेसाठी रिलायन्स फाउंडेशन सीएसआरमधून सहकार्य करीत असून महिला - बालविकास विभागामार्फत तांत्रिक सहाय्य,प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात येत आहे.