Breaking News

नदीपात्रात होडी उलटून सख्ख्या बहीण - भावाचा दुर्दैवी अंत


सिंधुदुर्गनगरी, दि. 12, मार्च - आचरा - कणकवली मुख्य हमरस्त्यावर गोठणे आचरेकर स्टॉपनजीक रहाणार्‍या दशरथ आचरेकर यांची तीन मुले गोठणे कोंडवाडी येथील नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेली खरी, पण कपडे धुतल्यानंतर तेथेच दिसून आलेल्या होडीतून नौका विहार करण्याचा मोह या तीन भावंडाना अनावर झाला. त्या होडीने या तिघांना आपल्या कवेत घेतले. ही तीन भावंडे या छोट्याशा नौकेने नदीपात्रात विहार करू लागली. गडनदीच्या खाडीपात्रात 15 फूट खोल पाण्यात होडी बुडाली. या तीन जीवांची जगण्यासाठीची धडपड सुरू झाली. मात्र सुवर्णा आणि आकाश यांची ती धडपड काळाने बंद केली. पोहण्यात पटाईत असलेल्या दिपालीनं जिगरबाजी दाखवत काळाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत किनारा गाठला. स्वतःच्या डोळ्यादेखत बहीण भाऊ मृत्यूच्या कचाट्यात सापडत असताना आपण काहीच करू शकलो नाही, याचे शल्य दुर्घटनेतून बचावलेल्या अभागी दीपालीच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसत होते. या दुर्घटनेनंतर दुःखाचा डोंगर कोसळलेल्या आचरेकर कुटुंबाला सावरण्यासाठी अख्ख्या पंचक्रोशीन तिथ धाव घेतली. मात्र या कुटुंबावर ओढवलेल्या या परिस्थितीमुळे उपस्थितांचे देखील डोळे पाणावले.28 वर्षीय सुवर्णा, 22 वर्षीय दीपाली आणि 19 वर्षांचा आकाश अशी आचरेकर दाम्पत्याला तीन मुले. एक मुलगा आणि दोन मुली. यातील सुवर्णा ही ग्रॅज्युएट झालीय, तर दीपालीचे 10 वी पर्यंत आणि आकाश देखील एवढंच शिक्षण झाले आहे. मात्र रविवार 11 मार्च चा दिवस आचरेकर कुटुंबियांसाठी काळ बनून आला होता.