Breaking News

यावर्षी काजू उत्पादनात घट

सिंधुदुर्गनगरी, दि. 12, मार्च - कणकवली तालुक्यात दरवर्षी मिळणा-या काजू उत्पन्नात यावर्षी मोठी घट असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत काजूला झालेली फलधारणा व एकूण स्थितीचा विचार करता साधारणतः 50 टक्केपर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे यावर्षी काजू बागायतदार शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

याबाबत कृषी विभागाच्या सूत्रांशी संपर्क साधला असता यंदा थंडीचे प्रमाण अधिक राहिले तसेच थंडीचा कालावधी वाढला व त्यातच अनेकदा धुक्याचा प्रभाव अधिक असल्याने त्याचा फलधारणेवर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. काही प्रमाणात काजू कलमे वगळता पारंपरिक काजूच्या रोपांना फलधारणेचे प्रमाण खूपच कमी असल्याचे दिसून आले आहे.
दरवर्षी साधारणतः मार्च महिन्यापासून बाजारात मोठया प्रमाणात काजू येतात. मात्र, यावर्षी हे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीत वातावरणात काहीशी उष्णता वाढली असल्याने काजू तयार होऊ लागला असला तरीही मुळातच फलधारणाच कमी असल्याने त्याचा एकूण उत्पन्नावर परिणाम झाला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यावर्षी गतवर्षीच्या 50 टक्केपेक्षाही कमी उत्पन्न मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.