Breaking News

कोपरगांवची गांवे पूर्ववत करणार : केसरकर

कोपरगांव :प्रतिनिधी  - कोपरगांव मतदारसंघात राहत असलेल्या नागरिकांना कामासाठी राहाता आणि शिर्डी पोलिस ठाण्यात जावे लागते. त्यामुळे पश्चिम भागातील बहुतांश गावांची आणि तेथील रहिवाशांच्या मोठया प्रमाणात ससेहोलपट होते. त्यामुळे ही गांवे कोपरगांव पोलिस ठाण्यांला जोडण्यात यावी, अशी मागणी आ. स्नेहलता कोल्हे यांनी केली. त्यावर गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी पंधरा दिवसात डीजी कार्यालयाकडून याबाबतचा प्रस्ताव मागवून घेऊन ही गांवे कोपरगांव पोलिस ठाण्याला जोडली जातील, अशी ग्वाही केसरकर यांनी दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी {दि. १२} गृहराज्यमंत्री केसरकर यांच्या दालनात आ. कोल्हे यांच्या आग्रहावरून बैठक बोलविण्यात आली होती. त्यात मंत्री केसरकर यांनी ही ग्वाही दिली. याप्रसंगी खा. सदाशिव लोखंडे, शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सागर पाटील, नाशिक विभागीय पोलिस खात्याच्या वरिष्ठ अधिकारी श्रीमती राणे, सेनेचे नितीन औताडे आदींसह गृहमंत्रालयाचे विविध अधिकारी उपस्थित होेते. पोहेगांव येथील आउटपोस्ट पोलिस कार्यालयाला कर्मचारी नाही. त्यामुळे महाराष्ट्र्र, गुजरात अन्य राज्यातून साईदर्शनासाठी येणा-या साईभक्त प्रवाशांना याठिकाणी प्रवासात अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. तेव्हा पोलिस कर्मचारी पूर्ण क्षमतेने नेमले जावे, अशी मागणी आ. कोल्हे यांनी केली.

माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या कार्यकाळापासून कोपरगांव विधानसभा मतदार संघातील काकडी, मनेगांव, मल्हारवाडी, डांगेवाडी, सोयेगांव ही गांवे राहाता तर पोहेगांव शहापूर, बहादराबाद, बहादरपूर, जवळके, धोंडेवाडी, वेस, अंजनापूर आणि रांजणगांव देशमुख ही गांवे शिर्डी पोलिस ठाण्याला जोडण्यांत आली आहेत. त्यामुळे येथे काही गुन्हा घडला किंवा नैमित्तिक काम निघाले तर येथील रहिवाश्यांना याचा प्रचंड त्रास होतो. ही महत्वपूर्ण बाब आ. कोल्हे यांनी गृहराज्यमंत्री केसरकर यांच्या निदर्शनात आणून दिली.