Breaking News

जनतेला चांगल्या सुविधा द्या : कोल्हे


कोपरगांव : श. प्रतिनिधी - ग्रामीण विकासाच्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी थेट ग्रामपंचायतीला १४ वा वित्त आयोगाचा निधी देऊन विकासाच्या पैशाला लागणांरी गळती थांबविण्याचा प्रयत्न केला आहे. थेट जनतेतून निवडल्या गेलेल्या सरपंच बांधवांनी त्याचा विनियोग चांगल्या प्रकारे करून जनतेला चांगल्या सुविधा द्याव्यात, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष व साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे यांनी केले.

तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पूर्व भागातील धोत्रे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच्या साधना गवारे यांनी काळे-परजणे गटाच्या संगिता जामदार यांचा २८४ मतांनी पराभव करत विजय संपादन केला. या निवडणुकीत कोल्हे गटाचे सहा ग्रामपंचायत सदस्य निवडले गेले. या सदस्यांचा आ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले, तालुक्यातील दहा गावच्या हददीतून नागपुर-मुंबई समृध्दी महामार्ग जात आहे. त्याबाबत सुरुवातीला शेतक-यांमध्ये मतभेद करून देण्याचे काम झाले. मात्र जोपर्यंत शेतक-यांचे समाधान होत नाही, तोपर्यंत आपण त्यांच्याच बाजूने केंद्र व राज्यस्तरावर मंत्रालयात लढणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच एकमेव पहिले मुख्यमंत्री आहेत, की त्यांनी शेतक-यांच्या संपादित केलेल्या जमिनीची रक्कम तात्काळ २४ तासांच्या आत त्यांच्या खात्यावर जमा केली. तालुक्यातील धोत्रे गावच्या ग्रामस्थांनी राजकारण तेथेच सोडून आता नवविकास पर्वाला सुरूवात करून जनतेची सर्व कामे प्राधान्यांनी करावीत. ग्रामपंचायत सदस्या तालीब सय्यद यांनी आभार मानले.