Breaking News

खर्डा बसस्थानकाचा वनवास संपणार तरी केव्हा ?


तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा शहरातील बसस्थानक शिक्षणमंत्री विनोद तावडे व जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी गेल्या १४ महिन्यांपूर्वी आश्वासन देऊन बसस्थानक सर्व सुविधायुक्त करू, असे सांगितले होते. परंतु अद्याप या बसस्थानकात कसल्याच सुविधा अथवा काम झालेले नाही. त्यामुळे सर्व विरोधी पक्षाच्यावतीने रामनवमीपर्वाचे आचित्य साधून शिक्षणमंत्री तावडे आणि पालकमंत्री प्रा. शिंदे त्यांनी दिलेल्या या आश्वासनाची आठवण व्हावी, म्हणून प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेची पूजा व आरती करून खर्डा बसस्थानकावर ‘गांधीगिरी’ केली. 

खर्डा हे महत्वाचे व्यापारी केंद्रत्याचप्रमाणे तिर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ आहे. येथील बसस्थानकावरून मोठ्या प्रमाणावर एसटी बसेसच्या माध्यमातून प्रवाशी वाहतूक होते. परंतु या बसस्थानकावर प्रवाशांसाठी अद्यापपर्यंत कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. यासाठी खर्डा पंचक्रोशीतील राजकीय सामाजिक व इतर क्षेत्रातील अनेकांनी यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. त्यानंतर दि. ४ जानेवारी २०१७ रोजी या बसस्थानकाच्या कामाचे भूमिपुजन महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे व जलसंधारणमंत्री तथा पालकमंत्री ना. राम शिंदे यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करत करण्यात आले होते. 

 या गोष्टीस तब्बल १४ महिने उलटून गेले आहेत. तरीही अद्याप या बसस्थानकाच्या कामासंदर्भात कसलीच हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व प्रवाशी, नागरिकांच्यावतीने रामनवमीदिनी {दि. २५} खर्डा बसस्थानकावर प्रभूरामचंद्राच्या प्रतिमेची पुजा व महाआरती करून रामनावाच्या राम शिंदे या पालकमंत्र्यांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी ही गांधीगिरी करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, नितीन गोलेकर, जुबेर सय्यद, विजयसिंह गोलेकर, बाबा मोरे, सुनिल लोंढे, ज्योती गोलेकर, शिवकन्या इंगळे, चंद्रकात गोलेकर, श्रीकांत लोंखडे, धनसिंग साळुंखे, गणेश सुळ, मदन पाटील, राजेंद्र लोंढे, संतोष लष्करे, कल्याण सुरवसे, रघुनाथ गोलेकर, महालिंग कोरे, उदव ढेरे, प्रकाश गोलेकर, भास्कर गोपाळघरे आदींसह भाजपवगळता विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.