Breaking News

राज्यातील सूतगिरण्यांचा प्रश्‍न सोडवावा - कुणाल पाटील

धुळे, दि. 07, मार्च - धुळे जिल्ह्यातील तोट्यात असलेल्या सूतगिरण्या तसेच बंद पडलेल्या सूतगिरण्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करुन त्या नफ्यात चालविण्यासाठी शासनाने मदत करावी आणि त्यासाठी योग्य ती पावले उचलून कार्यवाही करावी अशी मागणी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी अधिवेशनात केली आहे. दरम्यान सरकारच्या उदासीन धोरणामुळे राज्यातील सूतगिरण्या अडचणीत आल्याचेही त्यांनी आपल्या तारांकीत प्रश्‍नातून मांडले आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्‍न मांडतांना आ.पाटील यांनी म्हटले आहे की, गेल्या काही वर्षात तोट्यात असलेल्या सूतगिरण्यांची संख्या वाढली आहे. हा तोटा 1 हजार 398 कोटी रुपयांवर पोहचला असल्याचे जानेवारी 2018 मध्ये निदर्शनास आले आहे. गेल्या तीन वर्षात शासनाच्या धोरणामुळे राज्यातील सहकारी सूतगिरण्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे 30 हजार कामगारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. यावर आपल्या उत्तरात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे की, राज्यातील उत्पादनाखाली असलेल्या 67 सहकारी सूतगिरण्यांपैकी 4 सहकारी सूतगिरण्या नफ्यात आहेत. उर्वरीत 63 सूतगिरण्या तोटयात असून त्याकरीता 2018-23 बाबत वस्त्रोद्योग धोरणाबाबत शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तर नफ्यातील आणि तोट्यातील सूतगिरण्यांसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असल्याचे मंत्री देशमुख यांनी म्हटले आहे.