Breaking News

वडांगळीत रंगपंचमी निमित्त जावयाची गाढवावरुन सन्मानपूर्वक मिरवणूक


सिन्नर, दि. 07, मार्च - सिन्नर तालुक्यातील धुलिवंदन ते रंगपंचमी या काळात जावयाची मिरवणुक सन्मानपूर्वक गाढवावरुन धिंड काढली जाते. शंभराहून अधिक वर्षांपासुन ही परंपरा चालत आलेली आहे.
परंतु या वर्षी मिरवणुकीसाठी जावई वडांगळीवासियांना मिळत नव्हता. अखेर पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनी त्यांना जावई गवसला. जावई मिळत नसल्याने यंदा ही प्रथा खंडीत होते की काय? याची धास्ती ग्रामस्थांना पडली होती मात्र शंभर वर्षापासून चालत आलेली परंपरा आजही वडांगळीवासियांनी अबाधित ठेवली. 
वडांगळी गावात रंगपंचमीच्या दिवशी जावयाची गाढवावरून डीजे च्या दणदणाटात जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे वडांगळी येथे गाढवदेखील नव्हते. मग ग्रामस्थांच्या पुढाकाराने अनेक कोस दूर जाऊन निफाड तालुक्यातील सायखेडा येथून गाढव आणण्यात आले. येथील ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश काहंडाळ यांना गाढवावर बसून गावामध्ये गल्लोगल्ली मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रंगांची उधळण करत मिरवणूक अभूतपूर्व उत्साहात पार पडली. जावयाच्या गळ्यात कांद्यांची माळ, डोक्याला सूप, गळ्यात चपलांचा हार अशा अनोख्या पेहेरावात जावयाची सजावट करण्यात आली होती.
मिरवणूक आटोपल्यावर बाळू मार्तंड खुळे यांच्या घरासमोर जावयाला आंघोळ घालण्यात आली. पंच वस्त्र देऊन जावयाचा सत्कार करण्यात आला. जावई मिरवणुकीला शिवसेना तालुकाप्रमुख दिपक खुळे यांनी सहकार्य केले.