Breaking News

शिवरायांचे कार्य जगासमोर एक प्रेरणा देणारे : प्रथमेश वर्धावे


नेवासा/शहर प्रतिनिधी/- शिवरायांनी बांधलेल्या अनेक गडाच्या भिंती ढासळलेल्या दिसत असल्या. तरी त्यांना बांधून ठेवणाऱ्या चिरांमधील निष्ठा आजही अबाधित आहे.यातुनच शिवरायांचे कार्य जगासमोर एक प्रेरणा देणारे असल्याचे दिसून येते. असे वक्तव्य बाल व्याख्याता प्रथमेश वर्धावे याने केले

तालुक्यातील वडाळा येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमप्रसंगी तो आपले व्याख्यान होता. याप्रसंगी मुळा कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच अमोल पतंगे, राहुल मोटे, अतिष मोटे, दत्तात्रय मोटे, हिमांशू मोटे हे उपस्थित होते. 

यावेळी आपल्या व्याख्यानात प्रथमेश म्हणाला की, शिव छत्रपतीनी मोजक्या साथीदारांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली. व पुढील काळात संघर्ष करत एका मागे एक किल्ले काबीज करत स्वराज्य निर्माण केले. ३५० वर्षांपूर्वी त्यांच्या वाट्याला मोठा संघर्ष आला. मात्र त्या संघर्षाला सामोरे गेल्यानेच शिवराय आजही तुमच्या आमच्या हृदयात विराजमान आहे. तुम्ही जग बदलण्याचा प्रयत्न केला तर कोठेच परिवर्तन दिसणार नाही. परंतु शिवराय सारखे स्वतःला बदलण्यात यश मिळवल्यास जग आपोआप बदललेले दिसेल. तरुणांनी शिवरायांसारखी जिद्द, चिकाटी,

अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रबळ इच्छा शक्ती तसेच त्यांचे वैचारिक संस्कार अंगीकारावे . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. डी. मोटे तर आभार भागचंद जाधव यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते