Breaking News

पिण्याच्या पाण्यासाठी पानोडीकरांचा अभूतपूर्व संघर्ष! टँकरसाठी आखली सह्यांची मोहिम


संगमनेर तालुक्यातील पानोडीच्या ग्रामस्थांचा गेल्या अनेक वर्षांपासून अभूतपूर्व संघर्ष आजही सुरु आहे. हा संघर्ष संपत नसल्याने अखेर येथील महिला आणि ग्रामस्थांनी त्वरित पाणी टँकर सुरु करावा, यासाठी सह्यांची मोहिम हाती घेतली.
मागील अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी येथिल ग्रामस्थाना संघर्ष करावा लागत आहे. तर आता उन्हाळा सुरु झाल्याने पानोडीकरांना भीषण पाणी प्रश्न भेडसावत आहेत. त्यामुळे महिला व ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी जीवनावश्यक कामे सोडून खूप वेळ पाण्यासाठी भटंकती करावी लागत आहे. तास न तास पाण्याची प्रतिक्षा करावी लागत आहे. पानोडी व परिसरात अनेक वर्षांपासून पावसाचे प्रमाण नगण्य असल्याने येथील भूगर्भातील पाण्याची पातळी अतिशय खोलवर गेली आहे. येथे असलेल्या विहरीमध्ये पाणी कमी असल्याकारणाने विद्युत मोटार अवघी १० मिनिटे सुरु राहते. त्यामुळे येथील सर्व ग्रामस्थ हतबल झाले आहेत.

पानोडीतील ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाबाबत मात्र येथील सत्ताधारी व विरोधी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. टँकरसाठी ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीला प्रस्ताव दिल्याचे सागितले जात आहे. पंचायत समिती या बाबीकडे का दुर्लक्ष करत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. पानोडी ग्रामपंचायत ही विखे गटाच्या तर पंचायत समिती आ. थोरातांच्या ताब्यात असल्यानेच या दोन नेत्यांच्या राजकीय संघर्षात पानोडीचे ग्रामस्थ भरडले जात आहेत.

पानोडीकरांची पाण्यासाठी सार्वजनिक टाकीवर होणारी गर्दी आणि लांबचलांब लागलेल्या ड्रम व हड्याच्या रांगा यामुळे पानोडीत असलेले पाण्याचे भीषण वास्तव येणाऱ्या जाणाराच्या नजरेस पडत आहे. पाण्यासाठी होणारी वणवण आजही सुरु आहे. त्यामुळे येथील महिला व ग्रामस्थांनी टँकर सुरु करावा, यासाठी सह्यांची मोहिम हाती घेतली आहे.

२० वर्षांचा संघर्ष लोकप्रतिनिधींनी सोडवावा 

काही वर्षांपूर्वी दुष्काळी गावांना शुध्द पाण्यांची सुविधा व्हावी, या हेतूने कोट्यावधी रुपयाची पानोडी व नऊ गांवे पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र या योजनेला राजकीय ग्रहण लागले. आता ही योजना अर्धवट अवस्थेत धूळ खात पडून आहे. त्यामळे पानोडी ग्रामस्थांना मागील २० वर्षांपासून पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. पाण्याची ही प्रतिक्षा लोकप्रतिनिधींनी सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरु लागली आहे.