Breaking News

गर्दी पाहून प्रुथ्वीतलावर जन्माला आल्याचा अभिमान वाटतो ः निलेश लंके

वाढदिवसानिमित्त उपस्थित जनसुदाय पाहून पृथ्वीतलावर जन्माला आल्याचा अभिमान वाटतो, आपण अण्णांच्या तालुक्यात रहातो, अण्णा सर्वांना आपल्या कुटुंबाचा एक भाग मानतात, त्याप्रमाणे हे सर्व माझे कुटूंबच आहे, उपस्थित सर्व माझे कुटूंबच आहे, हे सर्व कार्यकर्ते नसून माझे मोठे भाऊ, बहिण, आई, वडिल आहेत. मी निष्ठावंत शिवसैनिक आहे, मला काणी निष्ठा शिकविण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन तालुक्याचे नेते निलेश लंके यांनी केले.हंगा ता. पारनेर येथे शनिवार दि. 10 मार्च रोजी निलेश लंके यांच्या अभिष्टचिंतना निमित्त भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.


यावेळी जि.प सदस्य बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, अनिल कराळे, पुणे जि. प. सदस्य राजू जगदाळे, शिवसेना अहमदनगर शहर प्रमुख दिलीप सातपुते, शिवव्याख्याते गणेश शिंदे, माजी सभापती सुदाम पवार, नगर पंचायत समिती सभापती रामदास भोर, उल्हासनगर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देवराम ठुबे, युवा सेना तालुका प्रमुख तथा वनकुटेचे सरपंच राहुल झावरे, अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास गोल्हार, मुंबई माजी नगरसेवक कोंडिभाऊ तिकोणे, बाबासाहेब तरटे, संजय मते, वाघुंड्याचे सरपंच संदिप मगर, शिवसेना उपतालुकाप्रमुख दादा शिंदे, भोयरे गांगर्डाचे उपसरपंच दौलतराव गांगड, पाडळी रांजणगावचे माजी सरपंच विक्रमसिंह कळमकर, मुंबईचे पप्पू जासूद, समर्थ पॉलिटेक्नीकचे कैलास गाडिलकर, तालुक्यातील सर्व पक्षिय नेते, कार्यकर्ते, शिवसेना शाखा प्रमुख, युवा सेना प्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.

आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे पारनेर येथे आले असता सभा सुरू झाल्यानंतर तत्कालीन तालुकाप्रमुख निलेश लंके आपल्या समर्थकांसह कार्यक्रम स्थळी उशिरा आले. ते कार्यकर्त्याच्या खांदयावर बसून आले. त्यावेळी उद्वव ठाकरे यांचे भाषण चालू होते. यावेळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सभा संपल्यानंतर दगडफेक झाली. त्यात आ. औटी यांच्या गाडीची काच फुटली. तेंव्हापासून तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. तेव्हापासून लंके समर्थकांनी वाढदिवसानिमित्त मोठे शिक्तीप्रदर्शन करायचे ठरवले. त्यानुसार हंगा येथे स्वयंस्फूर्तीने मोठ्या प्रमाणात तरुण कार्यकर्ते व सर्व पक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान राजकीय वर्तुळात तेढ निर्माण झाले असतांना निलेश लंके आपल्या वाढदिवसानिमित्त काय भूमिका जाहिर करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. पुढे बोलतांना लंके आ. औटींचे नाव न घेता म्हणाले की, तालुक्यात बरेच जण कार्यक्रम घेतात व स्टेजवरती फक्त कुटूंबच असते.
मला बाळासाहेबांनी सांगितले की, 80% समाजकारण व 20 % राजकारण कर कधीच कमी पडणार नाही. याप्रमाणे मी 24 तास जनतेची सेवा करत आहे. मला आजही घर नाही, पाऊस आला तर माझे घर गाळते, तुम्हीच माझे कुटूंब आहात. त्यामुळे मला कुठलीच गोष्ट अशक्य वाटत नाही, आपण एवढया संख्येने उपस्थित राहाल हे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते, मित्रांनो ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है असे म्हणत लंके यांनी तालुक्यातील नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. मी आजही शिवसेनेचाच आहे, मला कुठल्याही प्रकारचा निरोप आला नाही. तुम्हा जनता जनार्धनांना विचारल्यावरच पुढचा निर्णय घेईल. यावेळी महिला, तालुक्यातील सरपंच उपसरपंच, ग्रा पं सदस्य, सेवा सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


न भुतों न भविष्यती एवढा समाज !
तालुक्यात एखाद्या नेत्याची सभा असल्यास समोर बसण्यासाठी गर्दीच नसते, ही गर्दी विकत घ्यावी लागते. मात्र लंके यांच्या वाढदिवसानिमित्त आठ दिवसापासून तालुक्यात फ्लेक्स लावण्यासाठी तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात राबत होता. मेळाव्याच्या अधल्या दिवशी सुमारे 500 कार्यकर्ते नियोजनासाठी हंगा येथे उपस्थित होते. तालुक्यातील प्रत्येक गावातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. तर काही स्वयंस्फूर्तीने आले. व्यासपिठावर कोणताही राजकीय नेता नसतांना एवढा समाज जमा झाला. यामुळे पारनेर मधील राजकीय पुढार्‍यांना जोरदार धक्का बसला.