Breaking News

महिलांना बँकेमार्फत कर्ज स्वरूपाची मदत ः बी. एम. कोरी

महिलांनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बँकेमार्फत कर्ज स्वरुपाची मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भारतीय रिझर्व बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक बी. एम. कोरी यांनी केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने जामखेड पंचायत समितीमध्ये महिलांना कर्ज मंजुरी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भारतीय रिझर्व बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक बी. एम. कोरी अध्यक्ष स्थानी होत. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अग्रणी बँक अधिकारी कुमार गौरव, गटविकास अधिकारी प्रज्ञा माने, शाखा अधिकारी एच. एम. लोहकरे, विनोद पवार, जिल्हा बँकेचे पी. एस. कुलकर्णी, जयश्री शेटे, जिल्हा उद्योग केंद्राचे साळवे उपस्थित होते.

यावेळी प्रथम सत्रात महिलांना आरोग्य विषयक माहिती देवून प्रबोधन करण्यात आले. यावेळी डॉ. गायकवाड, डॉ. देवकर, डॉ. चकोर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर महिला बचत गटांना व महिलांना सेंट्रल बँकेमार्फत कर्ज मंजुरीचे पत्र देण्यात आले. असे महिला गटविकास अधिकारी प्रज्ञा माने म्हणाल्या की, महिलांना संधी मिळाल्यास त्यांनी पुरुषांपेक्षाही चांगली कामगिरी करून दाखवावी. यावेळी शाखाधिकारी लोहकरे, कुमार गौरव यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी बँकमित्र गणेश अडसूळ, विनोद घायतडक, पवार, येवले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एस. कुलकर्णी यांनी केले. आभार विनोद पवार यांनी मानले.