Breaking News

आरोग्य विभागातील नेमणुकीचे बोगस आदेश देऊन फसवणूक

वाई, (प्रतिनिधी) : आरोग्य विभागात शिपाई़, क्लार्क, सुपरवायझर यांच्या नेमणुकीचे बोगस आदेश देऊन लाखो रुपयांचा गंडा घालणार्‍या भामट्याने अनेकांना फसवण्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याची मागणी होत आहे.


वाई तालुक्यातील व्याहळी येथील मीरा जयंत जगताप व तेजस जयंत जगताप या कुटुंबाची पुणे ते सातारा प्रवास करत असताना बसमध्ये त्यांची ओळख डॉ. रवींद्र ऊर्फ राजेंद्र श्रीराम पाटील, सेंट्रल विभाग, पुणे असे नावाच्या व्यक्तीशी झाली. यामध्ये त्याने आरोग्य विभागात आपण शिपाई, क्लार्क, सुपरवायझर या पदांच्या थेट भरती केल्याचे आदेश देत असल्याचे सांगून त्यांच्याकडून 1200, 3000 रुपये टप्प्या-टप्प्याने उकळण्यास सुरूवात केली. 
तुमच्या ओळखीने आणखी कोण गरजू उमेदवार असेल तर त्यांची ओळख करून द्या, असे सांगून त्याने अनेकांची फसवणूक केल्याची माहिती व्याहळी येथील फसवणुक झालेल्या जगताप कुटुंबाने पत्रकारांनी दिली. नेमणूकीचा लेखी आदेश मिळेपर्यंत कोठेही वाच्यता करू नका, असे सांगत ही व्यक्ती परिसरातील लोकाकडून लाखो रुपये लुबाडत राहिला. 
यादरम्यान या इसमाने आणखी लाभार्थी मिळतील म्हणून व्याहळी येथील एका महिलेस व तिच्या मुलास ग्रामीण रूग्णालय वाई येथे सुपरवायझर व शिपाई अशी ऑर्डर आरोग्य सहसंचालक सेवा, पुणे यांच्या सही व शिक्क्याने इंटरनेटद्वारे इमेल केली.
यापैकी भुईंजमधील बारावीची परीक्षा दिलेल्या तरूणाची शिपाई म्हणून ग्रामीण रूग्णालय भुईंज येथे नेमणूक झाल्याचा आदेश इमेलद्वारे पाठविला. तो आदेश घेवून संबंधित तरुण भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचला असता प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेश बिरारी यांनी हा नेमणूकीचा आदेश बोगस असल्याचे निदर्शनास आणून दिले. आमच्या आरोग्य केंद्रात चार शिपाई आहेत. तसेच आम्हाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून नियुक्तीचे आदेश प्राप्त होतात. त्यामुळे ही ऑर्डर बोगस असल्याचे उघड झाल्यानंतर जगताप कुटुंबाने अन्य कोणाची आणखी फसवणूक होवू नये म्हणून याची माहिती पत्रकारांना दिली.