Breaking News

विद्यार्थीनींचा मृतदेह आढळला; घातपाताची शक्यता

बीड, (प्रतिनिधी):- ऊसतोड मजुराच्या कुटूंबातील एका 16 वर्षीय बेपत्ता मुलीचा मृतदेह पोखरी (ता.वडवणी) परिसरातील कान्होबाची टेकडी येथे काल सकाळी आढळून आला आहे. अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने तिच्यावर अत्याचार करुन खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असुन शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. दरम्यान मोबाईल टॉवरजवळील जनरेटरच्या पाठीमागेच विद्यार्थीनीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असुन पोलिस पुढील तपास करीत आहे.
बीड तालुक्यातील केसापुरी परभणी येथील एक 16 वर्षीय विद्यार्थीनी 9 वीच्या शिकत होती. तिचे आईवडिल ऊसतोड मजुर असुन कालपासुन सदर मुलगी बेपत्ता होती. काल सकाळी पोखरी (ता.वडवणी) शिवारातील कान्होबाच्या टेकडीवरील एका मोबाईल टॉवरजवळ जनरेटरच्या पाठीमागे तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळल्याने अत्याचार करुन तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती कळताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सपोनि. गजानन जाधव सहकार्यांसह घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करण्यात आला आहे. घटनास्थळी जिन्स पँन्ट, गॉगल असे साहित्य सापडले असुन पोलिस अधिक तपास करीत आहे. दरम्यान मयत विद्यार्थीनीच्या अंगावर कसल्याही जखमा नसल्याचे सांगितले जात असुन मृत्यूचे नेमके कारणही स्पष्ट झालेले नाही. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असुन शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिस सुत्रांनी सांगितले.