Breaking News

सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट; दुकानाची केली तोडफोड


समाजाच्या एका गटातील तरूणाने ‘व्हॉटसअ‍ॅप’ ग्रुपच्या माध्यमातून दुसऱ्या गटातील सदस्यांबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकला. या कारणावरून एकाच समाजातील दोन गटात मंगळवारी {दि. १२} तणाव निर्माण झाला. या प्रकारानंतर राजापूर रस्त्यावरील एका भंगार खरेदी-विक्रीच्या दुकानाची तोडफोड करण्यात आल्याने शहर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या गुन्ह्यात एका तरूणावर धार्मिक भावना दुखाविल्याचा तर दुसऱ्या गटातील चार ते पाच अज्ञातांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या दोन्ही घटना एकाच पार्श्वभूमीतून घडल्या.

शहरातील मोमीनपूरा परिसरात राहणाऱ्या रिझवान मोहंमद चौधरी यांनी व्हॉटसअ‍ॅपवर ‘मीम’ नावाचा समूह तयार केला आहे. या समुहात इम्तियाज रहिमखान पठाण {रा. मोमीनपुरा, संगमनेर} याचा समावेश आहे. मंगळवारी त्याने वादग्रस्त मजकूर टाकल्याने एकाच समाजातील दोन गटात तणाव निर्माण झाला. याप्रकरणी रिझवान चौधरी यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन इम्तियाज पठाण याच्याविरोधात धार्मिक भावना दुखाविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोकुळ औताडे तपास करीत आहेत. 

यानंतर संध्याकाळी सहाच्या सुमारास राजापूर रस्त्यावरील भंगार खरेदी-विक्रीच्या दुकानाची चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. याप्रकरणी हिना मोहसिनखान पठाण {रा. राजापूर रोड, संगमनेर} यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी चार ते पाच अज्ञात व्यक्तिंविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास हेड कॉ. डी. आर. गोरे करीत आहेत.