‘साकरवाडी’त महिलादिन उत्साहात
तालुक्यातील साकरवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिलादिन मोठ्या उत्साहात पार पडला. मुख्याध्यापक अशोकराव बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रूपाली विसपुते होत्या.
याप्रसंगी कर्तबगार महिलांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थीनींनी विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांची वेशभूषा सादर केली. ‘बालकांचे शिक्षण व आरोग्य यात महिलांची भूमिका’ या विषयावर विशाखा निळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
महिलादिनानिमित्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी जालिंदर आहिरे यांनी नवीन महिला मतदारांना मतदार ओळखपत्राचे वाटप केले. पात्र महिलांना नावनोंदणीसाठी आवाहन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रांजली मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रमोद दारंकुडे यांनी परिश्रम घेतले. निवृत्ती गोडे यांनी आभार मानले.