Breaking News

वाडी ते गुलबर्ग्यापर्यंत विद्युत रेल्वे इंजिनची चाचणी यशस्वी


सोलापूर, दि. 03, मार्च - वाडी ते गुलबर्गादरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता तो सेक्शन विद्युत इंजिनवर धावण्यास सज्ज झाला आहे. नुकतेच वाडी ते गुलबर्गादरम्यान विद्युत इंजिन धावून याची चाचणी घेण्यात आली. चाचणी यशस्वी झाली असून मुख्य संरक्षक आयुक्त यांच्या निरीक्षणानंतरच रेल्वे विद्युत इंजिनवर गुलबर्ग्यापर्यंत धावतील , अशी माहिती विभागीय विद्युत अभियंता योगेशकुमार सिंग यांनी दिली. दक्षिण भारतातून सोलापूरकडे येणार्‍या गाड्या या सध्या वाडी स्थानकापर्यंत विद्युत इंजिनवर धावत आहेत. वाडी स्थानकावर गाडी आल्यानंतर तेथे विद्युत इंजिन काढून डिझेल इंजिन जोडण्यात येते. आता मात्र विद्युतीकरणाचे काम गुलबर्गा स्थानकापर्यंत पूर्ण झाले असून विद्युत इंजिनची यशस्वी चाचणीदेखील झाली आहे. मध्य विभागाचे मुख्य संरक्षक आयुक्त हे या भागाची पाहणी करतील. काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले असेल तर विद्युत इंजिनवर धावण्यास हा मार्ग सक्षम असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल. यानंतरच हा मार्ग विद्युत इंजिनसाठी खुला केला जाईल. जसजसे विद्युतीकरणाचे काम पूर्ण होईल तो सेक्शन विद्युत इंजिनवर रेल्वे धावण्यासाठी खुला होईल.