Breaking News

८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे : देशमुख


कोपरगाव प्रतिनिधी - राज्यात सुमारे ३७ हजार औद्योगिक कारखान्यांची नोंदणी झाली आहे. त्यात ३० लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्या माध्यमांतून सुमारे दीड कोटी जनतेला अपघातशून्य ध्येय ठेवून त्याबाबत सुरक्षिततेचे प्रशिक्षण देऊन सुरक्षितता सप्ताह साजरे होत आहेत. वास्तविक पाहता ८० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळेच होतात. तर २० टक्के अपघात हे यांत्रिक असतात, असे प्रतिपादन अहमदनगर येथील औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक स्वप्निल देशमुख यांनी केले.

तालुक्यातील संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे होते. प्रारंभी कार्यकारी संचालक जीवाजीराव मोहिते यांनी प्रास्तविक केले. कारखान्याच्या सर्व कर्मचा-यांची सुरक्षितता लक्षात घेऊन अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी अत्याधुनिक सुसज्ज उपकरणे घेतली असून सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सुरक्षा ध्वजारोहणानंतर कामगारांना सुरक्षा शपथ देऊन औद्योगिक सुरक्षा उपकरण प्रदर्शनाचे उदघाटन यावेळी करण्यात आले. साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे व रासायनिक सरव्यवस्थापक आर. के. सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रशासकीय व्यवस्थापक तथा सुरक्षा अधिकारी प्रकाश डुंबरे यांनी कारखान्यातील वर्षभराचा औद्योगिक सुरक्षा आढावा सादर केला. याप्रसंगी संचालक साहेबराव कदम, सुभाष आव्हाड, शिवाजीराव वक्ते, पोपटराव पगारे, संजय होन, अशोकराव भाकरे, भास्करराव भिंगारे, प्रदिप नवले, वेणुनाथ बोळीज, कामगार नेते मनोहर शिंदे, कार्मिक अधिकारी प्रकाश चांदगुडे, कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने आदींच्या हस्ते अपघात टाळण्यासाठी सहकार्य केलेल्या कामगारांना प्रमाणपत्र व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. संचालक संजय होन यांनी आभार मानले.