Breaking News

‘दान पावलं दान पावलं’ पैठणमध्ये वासुदेवाचे आगमन


पैठण प्रतिनिधी - ‘रामकृष्ण’ ‘वासूदेवा’ असा गजर करीत यापूर्वी गावात सकाळच्या रामप्रहरी संत एकनाथ महाराजांच्या एकनाथी भारुडातील वासूदेव मोह, भ्रांती, बुध्दीभ्रष्टतेच्या निद्रेत घोरत पडलेल्या समाजाला जागे करीत असत. पहाटच्या रम्य वेळी हातातल्या चिपळ्या आणि पायातील चाळांचा ‘छन्नक छन्नक’ आवाज करीत ते गावात आगमन करीत. अंगणात वासुदेव आला म्हणजे श्रीकृष्णच वासुदेवाच्या रुपात उभा आहे, या भावनेने महिला सुपात धान्य घेऊन येई. असा वासुदेव आता गावागावात तुरळकच दिसू लागला. मात्र पैठणच्या नाथषष्ठीमध्ये दरवर्षी हमखास नाथाच्या चरणी हा वासुदेव हजेरी लावत असतो. डोक्यावर मोरपिसांची टोपी, अंगात घोळदार अंगंरखा, गळ्यात तुळशीच्या माळा, कमरेला पावा {बासरी}, हातातील टाळ आणि चिपळ्यांच्या तालावर पावले टाकीत नाथषष्ठीत वासुदेवाचे आगमन झाले. संपूर्ण यात्रेत ‘दान पावलं, दान पावलं, भिमाशंकरी महादेवाला, पैठणमधी एकनाथ बाबाला, दान पावलं, जनता जनार्दनाला’ असा टाळाच्या ठेक्यात गिरकी टाकून कुणी दान दिले, की ते दान खरोखरंच सर्व देवीदेवतांना पोचलंय, याचा सात्विक आनंद या वासूदेवाच्या चेहऱ्यावर दिसू लागतो. संतांच्या शिकवणीचा प्रसार करणारा हा वासुदेव अहंकार घालवून गुरूवचनाची वाट पहाटवेळी सर्वांना दाखवित आहे.