Breaking News

अर्थसंकल्पात केवळ घोषणा, तरतूद मात्र शून्य - आ. पंकज भुजबळ

मुंबई, दि. 10, मार्च - अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधीमंडळात सन 2018 चा अर्थसंकल्प सादर केला सदरच्या अर्थसंकल्पात आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन केवळ घोषणा के ल्या गेल्या असून तरतूद मात्र शून्य आहे आणि विशेष म्हणजे नाशिककरांसाठी कुठलीही योजना किंवा निधीची तरतूद नसल्याने सदरचा अर्थसंकल्प म्हणजे गेला बजेट कुणीकडे ? अशा शब्दात नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आ.पंकज भुजबळ यांनी टीका केली आहे.

अर्थसंकल्पावर दिलेल्या प्रतिक्रियेत आमदार पंकज भुजबळ यांनी म्हटले आहे की, सन 2018 च्या अर्थसंकल्पात सरकारने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ घोषणा केल्या आहेत. त्यासाठी मात्र भरीव अशी तरतूद करण्यास सरकार अपयशी ठरल्याचे दिसते. तसेच राज्यातील शेतकरी अडचणीत असतांना शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफीतून दिलासा देण्याची गरज होती. मात्र सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. एकीकडे शेतमालाचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र शेतकर्‍यांच्या शेतमालाला हमी भाव देण्यासाठी सरकार अपयशी ठरत आहे, त्यासाठी सरकारकडून ठोस उपाययोजना नाही. सरकारने घोषणा खूप केल्या मात्र त्यासाठी ठोस तरतूद केलेली नाही. विशेषतः नाशिक शहर व जिल्ह्यासाठी कुठलीही योजना किंवा भरीव निधी दिलेला नाही. त्यामुळे हा अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प असल्याचे आ.पंकज भुजबळ यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.