Breaking News

नवी मुंबई मनपा आयुक्तांनी घेतला अमृत योजना व इतर सुविधा कामांचा प्रत्यक्ष आढावा

नवी मुंबई, दि. 10, मार्च - नागरिकांसाठी पुरविण्यात येणा-या नागरी सुविधा कामांमधील गुणवत्ता चांगली असावी तसेच कामांमध्ये गतीमानता यावी याकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे कटाक्षाने लक्ष असून त्यांनी अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण, शहर अभियंता मोहन डगांवकर आणि संबंधित अधिकारी यांच्यासह केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या तसेच इतर सुविधा कामांची पाहणी केली.
या आढावा दौ-यात आयुक्तांनी ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरूळ तसेच घणसोली सेक्टर 20 येथील नाल्याशेजारी त्याचप्रमाणे सेक्टर 10 वाशी येथईल मिनी सी शोअर व सेक्टर 30 सानपाडा येथे कें द्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या हरित पट्टा विकास कामांची पाहणी केली.


शहरामंध्ये मोठमोठ्या इमारती तसेच प्रशस्त रस्ते, पदपथ अशा पायाभूत सुविधा विकसित होत असताना पर्यावरणशीलता जपणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे उद्याने, हरितपट्टे हे शहरांना प्राणवायू पुरविणारी फुफ्फुसे आहेत हे लक्षात घेऊन अमृत योजनेअंतर्गत ही हरितपट्टा विकासाची कामे सुरू आहेत. या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आयुक्तांनी याठिकाणी काँक्रिटीकरणाचे प्रमाण अत्यल्प ठेवून हरितकरणाचे प्रमाण जास्तीत जास्त ठेवावे असे सूचित करीत येथे नैसर्गिकता जपावी असे निर्देश दिले. याठिकाणी लावण्यात येणारी वृक्षरोपे मोठ्या आकाराची असावीत तसेच त्यांच्या पाण्याची व्यवस्था पुरेशी व कायमस्वरूपी असावी असे त्यांनी विशेषत्वाने सूचित केले.