Breaking News

यंदा पाऊस भरपूर, रोगराई वाढणार कुळधरणच्या जगदंबा मंदिरात पाडवा वाचन

कर्जत तालुक्यात गुढीपाडव्याचा सण विविध पध्दतीने उत्साहात संपन्न झाला.गुढीपाडव्याच्या निमित्ताने घराच्या दाराला झेंडूचे तोरण बांधून, आंब्याच्या डहाळा लावून, रांगोळी काढून दारात गुढी उभारून पारंपरिक पध्दतीने तर काही ठिकाणी भगवे झेंडे फडकवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांना अभिवादन करुन सण साजरा झाला.कुळधरणच्या जगदंबा मंदिरात बंडुकाका लहाडे यांनी पाडवा वाचन केले.


नवे कपडे परिधान करुन पारंपरिक पद्धतीने सकाळी गुढी उभारण्यात आली. एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देण्यात आल्या. मोठ्या धूमधडाक्यात आणि उत्साहात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. खास पुरणपोळी बनवुन कडूनिंबाची पाने- फुले आणि गुळ खाण्याची पारंपरिक पद्धती अवलंबिण्यात आली.
मराठी नववर्षाचा उत्साह सर्वत्र पहावयास मिळाला. समृद्धी, विजय आणि सामाजिक संदेशांची किनार यांचे प्रतीक असलेल्या गुढीची उभारणी घराघरात करण्यात आली. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा वसंत ऋतूचा पहिला दिवस.साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा या दिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी बाजारपेठा फुलून गेल्या होत्या.

पाडवा वाचन ऐकण्यासाठी गर्दी
कुळधरणला जगदंबा देवीच्या मंदीरात दरवर्षी पाडवा वाचन करुन भविष्यवाणी केली जाते. धोंडिराज महाराज मठातील बंडुकाका लहाडे यांनी वाचन केले. यंदा भरपूर पाऊस पडेल मात्र पिकांवर जास्त रोगराई पडेल. हिरे, माणिक मोती यांचे भाव वाढणार असे भाकित मांडण्यात आले.

पालावरच पाडवा साजरा
भटकंती करत जीवन व्यथित करणारे ऊसतोड कामगार, लोहार, घिसाडी आदी कुटुंबातील लोकांनी आपल्या पालावर गुढी उभारून सण साजरा केला. मूलभूत सुविधांपासुन वंचित व उपेक्षित लोकांना हाल अपेष्टा सहन करीत दिवस ढकलावे लागत आहेत. अंगभर कपडे नसलेल्या चिमुकल्या बालकांमध्येही गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला. सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोंना हजारो लाईक येत असले तरी शासन मात्र त्यांच्या उद्धारासाठी विशेष काही करताना दिसत नसल्याचे विदारक चित्र पहावयास मिळते.

आज आपण चंद्रावर जाऊन आलो असलो तरीही आपल्याकडे दोन वेळचे अन्न मिळविण्यासाठी दिवसरात्र काम करावे लागणारी मंडळी देखील आहेत. या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपल्या सणावारांचे महत्व कमी होत नाही. कारण हे सण वार आपल्या पुर्वीच्या अनेक पिढ्यांपासून साजरे केले जात आहेत. आणि त्याचे आपणा सर्वांसाठी अनन्यसाधारण महत्व आहे. आज झोपडीमध्ये राहणार्‍या गरिबातल्या गरिब नागरिकांनी देखील गुढी उभारून सन साजरा केला.