तीन महिने तेजी मंदी, तर नऊ महिने सुकाळ, भरपूर पाऊस असे सर्व चांगले भविष्य कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजांनी लिहिलेल्या सवत्सरात भाकीत निघालेले असताना राजकारण्यांना मात्र भयंकर त्रास दाखविल्यामुळे याबाबत आगामी काळात काय होऊ शकते याच्या चर्चा झडू लागल्या आहेत. कर्जत येथे दरवर्षी मराठी नव वर्षांरंभी म्हणजे गुढीपाडव्यादिवशी ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजानी लिहिलेल्या सवत्सराचे वाचन येथील समाधी मंदिरात केले जाते. महाराजांनी आपल्या हाताने संवत्सराचे भाकीत लिहून ठेवलेले असून त्यातील यावर्षीचे पानाचे वाचन मंदिराचे पुजारी पंढरीनाथ काकडे यांनी आज दुपारी केले. शक 1940 म्हणजे 2018-19 या वर्षीच्या संवत्सराचे नाव विलंबी संवत्सर असे आहे. या संवत्सराचा स्वामी रवी असून चैत्र वैशाख व जेष्ठ हे तीन महिने तेजी मंदी तसेच महागाईचे जातील या वर्षात दक्षिण उत्तरेतील राजकीय लोकांना भयंकर त्रास होईल. त्यांना खडतर अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. पुढील नऊ महिने अत्यंत चांगले जातील. या वर्षी मुबलक पाऊस होणार असल्याचे भाकीत वर्तवले गेल्याने उपस्थित हजारो भाविक शेतकर्यांनी महाराजाच्या नावाचा मोठा गजर केला. संत श्री गोदड महाराज यांनी आपल्या स्वहस्ते सर्व संवत्सराचे भविष्य लिहून ठेवलेले असून त्यातील त्या त्या वर्षीचे भविष्य दरवर्षी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वाचले जाते. त्यास बाढ असे म्हणतात, बाढात निघालेले भाकीत अत्यंत खरे ठरते, असा कर्जतसह पंचक्रोशीत अनुभव आहे. त्यामुळे हे भाकीत ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत असते. मंदिरात जागा पुरत नसल्यामुळे अनेकांना बाहेर बसून हे भाकीत ऐकावे लागते. यावर्षी मात्र साउंड सिस्टीम मध्ये बिघाड झाल्याने मंदिराबाहेरील भाविकांची मोठी निराशा झाली. त्यांना हे भाकीत ऐकायलाच मिळाले नाही. यावेळी महाराजांनी लिहिलेल्या भाकितासह दाते पंचागामध्ये लिहिलेले भविष्यही वाचण्यात आले. यानुसार या वर्षी भरपूर पाऊस असला तरी खराब हवामानामुळे लोक आजारी पडतील व तंटे वाढतील असेही पंचागामध्ये म्हटले आहे.
ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजांच्या संवत्सराचे वाचन
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:15
Rating: 5