Breaking News

सोशल मीडियाद्वारे मराठी चित्रपटांचे प्रमोशन व्हावे - विनोद तावडे


मराठी चित्रपटांच्या कथेमध्ये दम आहे, याचे सादरीकरण व्यवस्थित व्हावे. मराठी चित्रपटाचे कथानक देश-विदेशातील निर्मात्यांना आकर्षित करीत आहे. तंत्रज्ञानाच्या जमान्यात आता मराठी चित्रपटांचे प्रमोशन सोशल मीडियाद्वारे व्हावे, असे मत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणाऱ्या दर्जेदार मराठी चित्रपट निर्मिती अर्थसहाय योजनेच्या धनादेश वाटप कार्यक्रमप्रसंगी श्री. तावडे बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसचिव संजय भोकरे, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज, सहव्यवस्थापकीय संचालक प्रताप आजगेकर, डॉ. विकास नाईक आदींसह विविध निर्माते उपस्थित होते.मराठी चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन मिळावे यासाठी शासन दर्जेदार चित्रपट निर्मिती करणाऱ्यांना अर्थसहाय करते. मात्र हे पैसे आता धनादेशाऐवजी ऑनलाईन नेटबँकिंगद्वारे (आरटीजीएस) देण्याची सोय व्हावी, अशी अपेक्षा श्री. तावडे यांनी व्यक्त केली. श्री. तावडे यांनी निर्मात्यांना शासनाकडून काय अपेक्षा आहेत, याची माहिती जाणून घेतली. काही निर्मात्यांनी मराठी चित्रपटांना प्रदर्शनासाठी चित्रपटगृह उपलब्ध होत नसल्याची माहिती दिली, यावर श्री. तावडे यांनी दक्षिणेतील निर्मात्यांसारखे मराठी निर्मात्यांनी मजबूत संघटन करावे. तारीख निश्चित करून तो प्रदर्शित करावा, शासन त्यांच्या पाठिशी राहिल, असे सांगितले.

चित्रपटामध्येही सध्या स्पर्धा आली आहे, यामुळे एकाचवेळी तीन-चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार नाहीत, याची काळजी निर्मात्यांनी घ्यावी, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.


यावेळी श्री. तावडे यांच्या हस्ते तीन ‘अ’ दर्जा (40 लाख रूपये) व 20 ‘ब’ दर्जाच्या (30 लाख रूपये) मराठी चित्रपट निर्मात्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.