लोकांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याची आस सदैव बाळगा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत समाविष्ट उमेदवारांसोबत संवादाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्याच्या वर्षा या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या उमेदवारांशी अनेक विषयांवर दिलखुलास चर्चाही केली. निवडणुका, राजकारण ते व्यसनमुक्ती आणि राज्याची आर्थिक परिस्थिती –उद्योग धोरण अशा अनेकविध विषयांवर मुख्यमंत्र्यांनी आपले विचार मांडले.कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जीवनात ज्या क्षेत्रामध्ये आपण करू ते अर्थपूर्ण असलेच पाहिजे. त्या क्षेत्रामध्ये चांगले असे योगदान देण्याचा प्रयत्न करायला हवा. तुमच्याकडे कोणतेही कौशल्य असो, त्या व्यावसायिक कौशल्याचा विनियोग स्वतः यशस्वी होण्याबरोबरच लोकांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी व्हायला हवा. आपल्या कौशल्याद्वारे लोकांच्या जीवनात कसे परिवर्तन घडविता येईल, याची सदैव आस बाळगली पाहिजे.
मुख्यमंत्री फेलोशिप हा उपक्रम अतिशय उत्तमरित्या सुरु आहे. यात समाविष्ट अनेकांनी महत्त्वपूर्ण असे योगदान दिले आहे. या उपक्रमाचा आणखी कसा विस्तार करावा याबाबतही सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.यावेळी झालेल्या चर्चेत उपस्थित उमेदवारांनी मुख्यमंत्र्याशी संवाद साधत, निवडणूक पद्धतीतील सुधारणा ते शेतकरी कर्जमुक्ती, प्रशासकीय सुधारणा- झिरो पेंडन्सी, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, व्यसनमुक्ती, कुपोषण आणि त्यावरील उपाययोजना यांच्यासह राज्याची आर्थिक स्थिती, नुकताच झालेला अर्थसंकल्प आणि त्यातील तरतूदी, राज्याचे उद्योग धोरण अशा अनेकविध विषयांवर माहिती घेतली. अगदी राजकारणातील प्रवेश आणि त्यासाठी कसे प्रयत्न करावे लागतील, अशा प्रश्नांवरही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिलखुलासपणे चर्चा केली.
सुरूवातीला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सीएम फेलोशिप या लोगोचेही अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तूभ धवसे, प्रिया खान आदींची उपस्थिती होती.