उपनगराध्यक्षाच्या प्रयत्नातून प्रभागात प्रथमच होतोय रस्ता
शहरातील प्रभाग क्रमांक 21 मधील निमोणकर व गिरमे वस्तीवर दोनशेहून अधिक नागरी वस्ती असूनही या ठिकाणी येण्याजाण्यासाठी रस्ता उपलब्ध नव्हता. उपनगराध्यक्ष महेश निमोणकर व वस्तीवरील शिष्टमंडळाच्या मागणीची दखल घेऊन पालकमंत्री राम शिंदे यांनी 1 किमीचा मुरमीकरण व खडीकरण रस्ता करण्यासाठी 10 लाखांचा निधी देऊन वस्तीवरचा रस्त्याचा प्रश्न मिटवला आहे. या भागातील नागरिकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून ऊस, कांदा, लिंबू, चिकू, दूध, बोर असे पिके घेतली जातात.
वस्तीवरून गावात येण्यासाठी पायवाट आहे. त्यामुळे दुचाकी व बैलगाडीमार्गे मालाची ने-आण करावी लागते. करमाळा रस्ता ते गिरमे वस्ती शिवारापर्यंत रस्ता व्हावा म्हणून यापूर्वी अनेक वेळा प्रयत्न केले होते. पण रस्त्यासाठी जागा देण्यास शेतकरी तयार नव्हते. जसजसे शेतीतील उत्पादन वाढू लागले तसतसे रस्ता गरजेचा वाटू लागला. यादृष्टीने तीनही वस्तीतील शेतकर्यांची बैठक होऊन प्रत्येकाने रस्ता सोडण्याचे मान्य करून सुरवातीला लोकवर्गणीतून साधा रस्ता केला. परंतू पाऊसाळ्यात रस्ता उखडला जाऊन ये-जा करण्यासाठी त्रास होत असे. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी भेडसावत राहीला. कालांतराने नगरपरिषद निवडणुकीत वस्तीवरील महेश निमोणकर यांनी अपक्ष उमेदवारी करून निवडून आले. कालांतराने सत्ता बदल होऊन मंत्री शिंदे यांनी उपनगराध्यक्ष पद महेश निमोणकर यांना दिले.
वस्तीवरील रस्त्यासाठी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर यांच्या प्रयत्नांची व पाठपुराव्याची दखल घेऊन पालकमंत्री राम शिंदे यांनी 14 लाख रुपये पहिल्या फेजमध्ये दिले. या निधीतून करमाळा रस्ता ते गिरमे शिवारापर्यंत 20 फूट रूंद व 1 किमी. लांब असे रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सदर रस्ता झाल्यामुळे येथील शेतकर्यांना ट्रक व ट्रॅक्टरद्वारे शेतमालाची वाहतूक करणे सोपे झाले आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच वस्तीवरील नागरिकांना रस्ता होत असल्याने समाधान होत आहे.