Breaking News

राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता


मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील काही तासांमध्ये वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातील जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागांमध्ये पुढच्या पाच तासांमध्ये वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता वर्तवली. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे. ऐन उन्हाळ्यात अकोला आणि यवतमाळमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. अकोल्यात काल रात्री पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. रात्री 1 च्या सुमारास शहरासह आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस बरसला. जोरदार वादळी वार्‍याचा तडाखा संपूर्ण शहरासह आजूबाजूच्या परिसरालाही बसला. या पावसामुळे पिकांचे जास्त नुकसान झालं नसलं तरी उकाड्याने हैराण झालेल्या अकोलावासीयांना दिलासा मिळाला. अकोल्यासह मूर्तिजापूर आणि इतर भागातही जोरदार पाऊस बरसला. यवतमाळमध्येही रात्री हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला असून शहरात ढगाळ वातावरण आहे. पावसानंतर यवतमाळकरांची धावपळ उडाली होती. मात्र पावसाच्या हलक्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण झाला.