Breaking News

काँगे्सकडून प्रादेशिक पक्षांना साद


नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपला घेरण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ‘डिनर डिप्लोमसी’चा पर्याय निवडला आहे. येत्या 13 मार्चला स्नेहभोजनासाठी त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. या स्नेहभोजनाला कोण हजेरी लावणार याची उत्सुकता आहे. काँग्रेसच्या अंतर्गत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी नसलेल्या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. त्यात बिहारचे विरोधी पक्ष नेते तेजस्विनी यादव, हिंदुस्थानी अवामी मोर्चाचे (सेक्युलर) जीतन राम मांझी यांचा देखील समावेश आहे. या स्नेहभोजनाला दोघांनी उपस्थित राहण्यास संमती दर्शविली आहे. ’डीएमके’चे नेते एम. के. स्टॅलिन स्नेहभोजनाला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. तामिळनाडूचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 15 तारखेपासून सुरू होत आहे. त्यामुळे स्टॅलिन उपस्थित राहणार नसल्याचे समजते. मात्र, पक्षाच्या नेत्या कनिमोझी स्नेहभोजनाला हजेरी लावणार असल्याची माहिती डीएमकेच्या सुत्रांनी दिली.