Breaking News

संघर्ष समिती पुन्हा सक्रिय ; तहसिलदार, सिंचन विभागाला देणार निवेदन

कुकडी आवर्तनाचे येसवडी चारीला अनेक वर्षे अपुरे पाणी मिळत आहे. त्यामुळे या चारीवरील धालवडी, तळवडी, पिंपळवाडी, बारडगाव, येसवडी, करमनवाडी भागातील शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. चालू आवर्तनाला ठरलेल्या दाबाने नियोजन पाणी न मिळाल्यास संघर्ष अटळ असल्याची प्रतिक्रिया येसवडी कुकडी चारी संघर्ष समितीचे अध्यक्ष बापुराव सुपेकर यांनी दै. लोकमंथनशी बोलताना दिली. कर्जत तालुक्यात कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुटले आहे. त्याच्या पार्श्‍वभूमीवर धालवडी येथील निवासस्थानी ते बोलत होते.
कुकडीच्या आवर्तनाच्या भरोशावर शेतकर्‍यांकडून शेतात ऊसाची पिके घेतली जात आहेत. मात्र अपुर्‍या आवर्तनामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ऊस तसेच इतर पिके जळून जात असल्याचा अनुभव शेतकर्‍यांना वेळोवेळी येत आहे.

याबाबत बोलताना सुपेकर पुढे म्हणाले की, आता जर टेल टु हेड पध्दतीने सर्व शेतकर्‍यांपर्यंत पाणी पोहोचले नाही तर या पट्ट्यातील सर्व शेतकरी संघटित होवून आंदोलनाबरोबरच कायदेशीर लढा देतील.
कर्जत तालुक्यातील येसवडी चारीवरील शेतकर्‍यांना हक्काचे पाणी मिळत नसल्याने या भागातील शेतकर्‍यांनी एकत्र येवून सहा महिन्यांपुर्वी संघर्ष समितीची स्थापना केलेली आहे.कुळधरणपासुन करमनवाडी पर्यंतच्या अनेक गावातील शेतकर्‍यांनी हा लढा सुरु केल्याने शेतकर्‍यांना काहिसा न्याय मिळू लागला आहे. गेल्या आवर्तनाला समितीने निवेदन देवून आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यावर अभियंता साठे यांनी समितीच्या सदस्यांशी चारीवर येवून चर्चेने तोडगा निघाला. आवर्तनाचे समाधानकारक पाणी मिळाल्याने समितीने पुन्हा बैठका घेवून चालू आवर्तनासाठी निर्णायक पवित्रा घेतला आहे. धालवडी येथे रविवारी बापुराव सुपेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीसाठी समितीचे उपाध्यक्ष शशिकांत लिहिणे, सदस्य मोहन सुपेकर, शेषेराव सुपेकर, सुधीर जगताप, बंटीराजे जगताप, सहसचिव बंडू सुपेकर आदी उपस्थित होते.