Breaking News

मराठी पत्रकार संघामार्फत महिला पोलिस कर्मचार्‍यांचा सन्मान

तालुका मराठी पत्रकार संघातर्फे नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. 10 मार्च रोजी सायंकाळी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचार्‍यांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला. तसेच श्रीगोंदा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचा कायापालट केल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. तसेच श्रीगोंदा पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी अविनाश ढेरे व प्रकाश वाघ यांचा देखील ते करत असलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला. 

यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. बाळासाहेब बळे म्हणाले की, पोलीस व पत्रकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष उत्तम राऊत यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सर्वच पोलीस कर्मचारी, अधिकारी उत्तम प्रकारे काम करत आहेत असे सांगितले तर संघाचे जिल्हाअध्यक्ष दत्ता पाचपुते म्हणाले की महिला पोलीस कर्मचार्‍यांच्या कामाप्रति कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे. त्यामुळे हा सन्मान करण्यात येत आहे. ज्येष्ठ पत्रकार अशोक होनराव यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना पो. निरीक्षक बाजीराव पोवार म्हणाले की, अशाप्रकारे पत्रकारांकडून महिला पोलिसांचा सन्मान होणे ही कौतुकाची व पोलिसांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगून काम करत असताना पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागतो. लोकांना अजूनही कायद्याबाबत माहिती नसल्यामुळे काम करताना अडचणी निर्माण होतात. अनेक प्रकरणात राजकीय दबाव आणला जातो. त्यातून मार्ग काढून काम करावे लागते. यासाठी पोलिसांना पत्रकारांचे सहकार्य असणे गरजेचे असून लेखणीची ताकद मोठी असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी श्रीगोंदा तालुका मराठी पत्रकार संघाचे पत्रकार शिवाजी साळुंखे, अंकुश शिंदे, समीरन नागवडे, अर्षद शेख, अंकुश तुपे, पीटर रणसिंग, राजू शेख जिल्हा ग्रामीण पञकार संघटनेचे भरत दरेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार विषाल चव्हाण यांनी केले.