Breaking News

प्रधानमंत्री आवास योजनेचा उडाला फज्जा!


राहुरी ता. प्रतिनिधी - केंद्र सरकारने सर्वसामान्य गोरगरीब व सर्वच स्तरातील वंचितांना घरकुल मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची घोषणा केली आहे. मात्र या योजनेतील काही जाचक अटींमुळे अनेकजण या हक्काच्या योजनांपासून वंचित राहत आहेत. एका अर्थाने या प्रधानमंत्री आवास योजनेचा राहुरीत पूरता फज्जा उडाल्याचे समोर येत आहे 

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येकाला घरकुल मिळावे, यासाठी राहुरी शहरात मोठा गाजावाजा करण्यात आला. यासाठी अर्ज स्विकारण्यात आले. अर्ज स्विकृतीनंतर राहुरी शहरातील घर नसणाऱ्या व कच्चे घरे तसेच यापैकी ज्यांना जागाही नाही, अशांचेही अर्ज घेण्यात आले होते. मात्र तब्बल काही महीन्यांचा कालावधी उलटूनही अनेकजण या योजनेपासून वंचित असल्याचे चित्र समोर आले आहे 

प्रधानमंत्री आवास योजनेतील अर्ज स्विकृती व नंतर यातील नियमावली पाहता खरेच ही योजना राहुरी शहर हद्दीत मूर्तस्वरुप धारण करील का, असा सवाल या योजनेच्या दिरंगाई व प्रशासनाच्या ढिलाईमुळे समोर येताना दिसत आहे. जागेचे भाव गगनाला भिडलेले आहेत. अशात ज्या घटकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, ते वंचितच राहणार असे दिसते. ज्यांच्याकडे जागा आहे, मात्र शासन नियमावलीमुळे ज्या जागा बिगरशेती आहेत, अशाच घटकांचा यात समावेश होऊ शकतो. तसेच ज्यांना स्वतःच्या जागा आहेत मात्र त्या बिगरशेती नाहीत म्हणजे कृषी व इनामवर्ग तीनच्या जमीनी आहेत, ज्या जमीनींवर देवस्थान अथवा ट्रस्टची नावे आहेत, मात्र येथे वास्तव्यास असणाऱ्या नागरिकाची भोगवटादार म्हणून नगरपरिषद दप्तरी नोंद आहे, जो नगरपरिषदेचा कर भरतो, अशा नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. शहरात प्रभाग क्रमांक १ मध्ये अनेक नागरिक हे शहरातून विस्थापित होऊन इनामवर्ग तीनच्या जागेवर कच्च्या व ओबडधोबड वसाहतीत वास्तव्य करत आहेत. अशा नागरिकांना केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या रमाई आवास योजनेचा लाभच मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे. घरकुल योजनेसाठी असणाऱ्या जाचक अटी शासन शिथील करणार का, त्यास हक्काचा व जमीनीचा पक्का उतारा मिळून तो येथील जागेचा हक्कदार होऊन स्वप्नातील घरात राहणार का, की वंचित राहणार, हे मात्र येणारा काळच ठरविणार आहे. राहुरी शहरातील हा विस्थापित घटक मात्र आजमितिला घरकुल योजनेपासून कोसो दूरच आहे.