Breaking News

स्थानिकांमुळे गायी चोरण्याचा प्रयत्न फसला


पाथर्डी प्रतिनिधी - शहरातील फुलेनगर येथे गुरुवारी {दि. २९} मध्यरात्री १ वाजता लक्ष्मीबाई काळोखे यांच्या गायी टेम्पोतून चोरून नेण्याचा प्रयत्न येथील रहिवाशी राजू सोनटक्के यांच्या सतर्कतेमुळे फसला. टेम्पो स्थानिक रहिवाश्यांच्या मदतीमुळे सदर टेंपो {क्र. एम एच २३ व्ही ३७५९) गायीसह पकड्ण्यात आला. यावेळी सचिन सुखदेव तळेकर (रा. घाटपिप्री,ता. आष्टी) याला पकडण्यात आले. त्याचे असुन दोन साथीदार पळून गेले आहेत. या सर्वांविरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

सोनटक्के हे मध्यरात्री उठले असता त्यांच्या घरासमोर असलेल्या संस्कार भवन येथे एक टेम्पो उभा दिसला. इतक्या रात्री कोणाचा टेम्पो आहे, हा संशय आला म्हणून टेम्पो जवळ जाऊन पाहिले त्यावेळी टेम्पो जवळ तीन इसम दिसले. त्यांच्याकडे दोन गायी दिसल्या. कोणाच्या गायी आहेत, याबाबत त्यांनी विचारपूस केली असता त्यांनी या गायी आमच्या आहेत, असे उत्तर दिले. त्यानंतर सोनटक्के यांनी या गायी मी रोज इथेच पाहत असून या इथल्याच आहेत, असे सांगितले. त्यानंतर सोनटक्के यांनी काळोखे यांना फोन करून बोलावून घेतले. दरम्यान, त्यातील दोन जणांनी पलायन केले. तर तिसरा इसम पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांच्या टेम्पो च्या चाव्या काढून घेत त्याला पकडले आणि पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत राजू सोनटक्के यांनी फिर्याद दिली.