Breaking News

जमिनी जाऊनही 'ताजनापूर'साठी तरतूद नाही : घुले


शेवगाव प्रतिनिधी  - तालुक्यातील शेकडो एकर काळी कसदार जमीन जाऊनही ‘ताजनापूर’च्या लिफ्ट योजनेला भरीव स्वरूपाची तरतूद होत नाही, ही बाब शेवगावकरांच्या दृष्टीने दुर्देवाची आहे, असे स्पष्ट मत जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले यांनी व्यक्त केले. तालुक्यातील राक्षी येथे स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या. 

शेवगाव येथे १४ व्या वित्त आयोगातून घेतलेल्या पाणी पुरवठा पाईपलाईनचे भूमिपूजनप्रसंगी घुले यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. त्या म्हणाल्या की, आघाडी सरकारच्या काळात माजी आ. नरेंद्र घुले आणि माजी आ‌.चंद्रशेखर घुले यांनी या ताजनापूर प्रकल्पासाठी साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी आणला. त्यानंतर गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात या प्रकल्पासाठी एक कवडी रुपयाही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे बैठकींचा फार्स करण्यापेक्षा ठोस कृती होणे अपेक्षित आहे. साडेतीन वर्षांच्या काळात शेवगाव तालुक्यासाठी कोणतीही भरीव स्वरूपाची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेवगाव-पाथर्डी पाणी योजनेसह, ताजनापूर योजना धूळ खात पडली आहे. खरीप अनुदानातून शेवगाव तालुका का वगळला जातो, याचा विचार होणेही आवश्यक आहे. गोरगरीब कुटुंबाशी संलग्नित असलेल्या योजनांना सरकार नेहमी फाटा देत आहे. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाने, मार्केट कमिटी संचालक रतन मगर, हनुमान पातकळ, राक्षी गावच्या सरपंच सबनीस, ज्ञानदेव कातकडे, मनोज कातकडे, रविंद्र धायतडक, प्रा. उषा नरवडे आदी उपस्थित होते.